January 21, 2022

महाराष्ट्रात जानेवारीत ८० हजार मृत्यूंची शक्यता

Read Time:3 Minute, 34 Second

मुंबई : जानेवारीच्या तिस-या आठवड्यात महाराष्ट्रात करोनाचे दोन लाख सक्रिय रुग्ण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर, जवळपास ८० हजार रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप व्यास यांनी हा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या माहितीनुसार, जर एक टक्का मृत्यू झाले, तर हा आकडा ८० हजारांपर्यंत जाऊ शकतो.

यासंदर्भात डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना पत्र लिहिले आहे. करोनाची तिसरी लाट सौम्य असेल, या भ्रमात राहू नका आणि लसीकरण मोहीम अधिक जोमाने राबवा, असे या पत्रातून सांगितले आहे. प्रदीप व्यास यांनी पत्रात म्हटले आहे की, संभाव्य तिस-या लाटेसंदर्भात सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती पसरवली जात आहे.

त्यावर विश्वास ठेवू नका. कोरोनाची तिसरी लाट ही सौम्य असेल किंवा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशात सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. तर लोकांची सुरक्षा आणि लसीकरणावर अधिक भर दिला गेला पाहिजे. जनुकीय क्रमनिर्धारणाच्या (जीनोम सिक्वेन्सिंग) माहितीबाबत सांगायचे झाले तर, आताही ७० टक्के रुग्णांमध्ये करोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झालेला आहे. हा आकडा वेगवेगळ्या जिल्ह्यांत कमी किंवा जास्तही असू शकतो.

२४ तासांत रुग्णसंख्या आठ हजारांवर
राज्यात शुक्रवारी ८,०६७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. यात मुंबईतील पाच हजार ४२८ नवीन बाधितांचा समावेश आहे. यावरून राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसभरात १,७६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दिवसभरात ओमिक्रॉनबाधित चार रुग्ण आढळले असून, ते वसई-विरार, नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि पनवेल परिसरात प्रत्येकी एक बाधित आहे. ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ९७२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५ लाख ७४ हजार ८५९ इतकी झाली. दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा ११ हजार ६२० पर्यंत पोहोचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − 11 =

Close