
महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग…
देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची वाढती संख्या आणि लसीकरण मोहिमेबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज माहिती दिली. देशात प्रामुख्याने १० जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर, दिल्ली आणि बेंगळुरू शहर यांचा यात समावेश आहे.
वाढत्या रुग्णसंख्येबाबत आम्ही राज्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यात टेस्टचे प्रमाण अजूनही कमी आहे. त्यामुळे आता आरटीपीसीआर टेस्टवर भर देणे आवश्यक आहे. यासोबतच बहुतेक राज्यांमध्ये आयसोलेशन होत नाही. नागरिकांना घरीच वेगळे राहण्यास सांगितले जाते. पण यासाठी जी देखरेख ठेवावी लागते, ती खरेच होते का? जर हे शक्य होत नसेल तर त्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करणे आवश्यक आहे, असे राजेश भूषण यांनी सांगितले. पंजाबमध्ये एक तर वेगाने चाचण्या होत नाहीत आणि संक्रमित रुग्णांना तात्काळ आयसोलेशनमध्ये ठेवले जात नाही, असेही आढळून आले आहे.ज्या राज्यांत रुग्ण वाढत आहे, तेथे चाचण्या वाढविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून गंभीर स्थितीचा सामना करावा लागत आहे. पण संपूर्ण देश संभाव्य धोक्यात आहे. व्हायरसला रोखण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असे देशातील सद्यस्थितीबद्दल नीती आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.
महाराष्ट्राची आठवड्याची सरासरी २३ टक्क्यांवर
आठवड्याचा राष्ट्रीय सरासरीचा पॉझिटिव्हिटी दर हा ५.६५ टक्के आहे. यात महाराष्ट्राची आठवड्याची सरासरी २३ टक्के, पंजाबची ८.८२ टक्के, छत्तीसगड ८ टक्के, मध्य प्रदेशचा ७.८२ टक्के, तामिळनाडू २.५० टक्के, कर्नाटकचा २.४५ टक्के, गुजरातचा २.२ टक्के आणि दिल्लीचा २.०४ टक्के इतका आहे, अशी माहिती भूषण यांनी दिली.