January 21, 2022

महापौरांनी स्वच्छता कर्मचा-यांस दिला पुरस्कार स्वीकारण्याचा मान

Read Time:3 Minute, 42 Second

लातूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लातूर शहराने जीएफसी थ्री स्टार व ओडीएफ ++ मानांकन मिळवत देशात ३८ वा क्रमांक पटकावला. लातूर शहराची या अभियानातील आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शनिवारी (दि.२० नोव्हेंबर) या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी महापालिकेच्या वतीने स्वत: हा पुरस्कार न स्वीकारता स्वच्छता कर्मचारी लताताई रसाळ यांना देश पातळीवरील हा पुरस्कार स्वीकारण्याचा सन्मान दिला.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लातूर शहराला प्रथमच जीएफसी थ्री स्टार मानांकन मिळाले.केंद्र सरकारच्या वतीने या अभियानाअंतर्गत पूर्वी सेव्हन स्टार, फाईव्ह स्टार व थ्री स्टार मानांकन देण्यात येणार होते पण ते रद्द करून सेव्हन स्टार ऐवजी फाईव्ह स्टार व फाइव्हस्टार ऐवजी थ्री स्टार मानांकन देण्यात आले. यात लातूर शहराने ३८ वा क्रमांक पटकावला. ही लातूर शहराची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वीही लातूर शहराने देशात ३८ वा क्रमांक पटकावला होता पण त्या काळात ओडीएफ प्लस प्लस व जीएफसी मानांकन देण्यात येत नव्हते.आता हे मानांकन असल्याने लातूर शहराची कामगिरी सर्वोत्तम ठरली.

दिल्लीत विज्ञान भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, शहरी विकास खात्याचे राज्यमंत्री, सचिव यांच्यासह छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेशसिंह बघेल यांचीही उपस्थिती होती. लातूर शहराच्या वतीने महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपाच्या सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, रवी कांबळे,अक्रम शेख, सोनवणे, पर्यावरण सल्लागार राहुल बोबे, सुमित ओझा, ओमप्रकाश वैरागे पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी दिल्लीत उपस्थित होते.

लातूर शहराने स्वच्छतेच्या बाबतीत आजवरची सर्वोत्तम कामगिरी बजावल्याबद्दल दिल्लीत देश पातळीवरील पुरस्कार देऊन महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला. मनपाच्या वतीने महापौर विक्रांत गोजमगुंडे व वरिष्ठ अधिकारी हा पुरस्कार स्वीकारतील असे अपेक्षित होते. परंतु महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी स्वच्छता कर्मचारी लताताई रसाळ यांना पुरस्कार स्वीकारण्याचा मान दिला.महापौरांच्या या सोहार्दतेचे कार्यक्रमास उपस्थित असणा-या देशभरातील मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 − 7 =

Close