
‘महा’पूर!
अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने राज्यात दणक्यात आगमन केले असून राज्यभरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पुर आला असून जनजिवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभावित झालेल्या गाव, शहर, जिल्ह्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मंगळवार दि. १२ जुलै रोजी दिले आहेत.
अनेक ठिकाणी पावसामुळे नद्या, नाल्यांना पूरही आल्याने राज्यात परिस्थिती बघून रेड, ऑरेंज आणि येलो अॅलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान १४ जुलैपर्यंत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या १० दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसापासून केव्हा दिलासा मिळेल असे प्रत्येकालाच वाटत आहे. पण सध्याच्या रिमझिम आणि मुसळधार पावसापासून दिलासा मिळण्यासाठी तुम्हाला ३ दिवस वाट पहावी लागणार आहे.
कारण आगामी तीन दिवसांसाठी हवामान विभागाने रेड अॅलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तर पश्चिम किनारपट्टीवरील द्रोणीय स्थितीचा परिणाम राज्यातील मान्सूनवर होणार आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. केवळ कोकण, मध्य महाराष्ट्रच नाही तर मराठवाडा आणि विदर्भात देखील मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील ५३ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली
मराठवाड्यात ८ ते १० जुलैला झालेल्या जोरदार पावसाने ३८७ गावांना पुराचा वेढा पडला आहे. यात हिंगोलीतील ६२, नांदेडमधील ३१०, बीडमधील १, लातूरमधील ८, उस्मानाबादमधील २ गावांचा समावेश आहे. या दोन दिवसात १६० मोठी, तर ३० लहान जनावरे दगावली आहेत. तर ५२ हजार १४९ हेक्टर खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहेत.
पुरात वाहून १६ जणांचा मृत्यू
संपूर्ण राज्यात आज पुराच्या पाण्यात वाहून १६ जणांचा मृत्यू झाला असून मराठवाडयात ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलिस स्टेशन अंतर्गत नाल्यात आलेल्या पुरात आठ जण वाहून गेले आहेत आणि पुण्यात तीघांचा मृत्यू असे एकूण १६ जण वाहून गेले आहेत.
सोलापूरात ११३ टक्के पावसाची नोंद
१॰ जूनपर्यंत सोलापूर जिल्ह्यात सरासरी १३९ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १५१ मि.मी. पाऊस पडला आहे. ११३ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत १९३ मि.मी. म्हणजे सरासरीच्या १४५ टक्के पाऊस पडला होता.
उस्मानाबादेत संततधार
जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी अनेक भागातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. गेल्या पाच दिवसापासुन जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. सुर्यदर्शनही झालेले नाही. मंगळवारी दि. १२ जुलै रोजी सकाळी आठ वाजलेपासून संततधार पाऊस सुरू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यात ६० टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
विष्णुपुरीसह बळेगावचे तीन दरवाजे वाजे उघडले
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर सोमवारी केवळ एक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाची मंगळवारी सकाळपासूनच नांदेड जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली आहेÞ गोदावरी नदी पात्रात पाण्याचा येवा वाढत आहे. यामुळे दुपारी अडीचच्या सुमारास विष्णुपुरी प्रकल्पाचा एक तर बळेगाव बंधा-याचे दोन दरवाजे उघडण्यात येऊन ३७७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
लातूरमधील नदिकाठच्या गावांना धोक्याचा इशारा
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत ११.०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २५३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. मांजरा, तेरणा व तावरजा नदीवरील बराज, को. प. बंधारेच्या पाणलोट क्षेत्रात येवा सुरु असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पर्जन्यवृष्टी राहून येवा प्रकल्पात येणारा येवा असाच राहीला तर प्रकल्प केंव्हाही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर प्रकल्पात येणारा येवा मांजरा, तेरणा व तावरजा नदीमार्गे सोडावा लागणार आहे. मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करुन राहीलेले नागरिक यांना सावधानतेचा इशारा लातूर पाटबंधारे विभाग क्र. १ लातूरचे कार्यकारी अभियंता रो. सु. जगताप यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
परभणीत वीजपुरवठा खंडित
परभणी शहरासह जिल्हाभरात काल सोमवार रात्रीपासून पावसास सुरूवात झाली असून मंगळवार दि. १२ जुलै रोजी दिवसभर पाऊस सुरूच होता. या पावसामुळे पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्यामुळे सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तर परभणी शहरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे मंगळवारी सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता.
हिंगोलीत धोक्याचा इशारा
हिंगोली जिल्हृयातील २४ तासांपासून रिमझिम पाउस पडत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी पाणी होऊन नदी, नाले, ओढयांना मोठया प्रमाणात पुर आला आहे. तसेच प्रशासनाने नदी जवळीला रहिवाशांना सुरक्षित स्थानी जाण्याचा सूचना दिल्या आहेत. जिल्हृयातील भटसावंजी तांडा गावालगत असलेल्या एका ओढयाला मुसळधार पावसामुळे मोठा पुर आला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या घरात गुडघ्या ऐवढे पाणी भरले आहेत. त्यामुळे सर्वत्र नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासह पोलिस दलाचे तेथे रेसक्यु ऑपरेशन सुरू आहे. यासह वसमत येथील कुरूंदा येथे ढगफुटी झाल्याने अख्खं गाव पाण्याखाली गेले आहे. तेथील वीजवितरण सर्व खंडीत झाले आहे.