
महापालिकांची प्रभाग रचना पुन्हा बदलणार
शिंदे सरकारच्या हालचाली, आदेशही जारी
मुंबई : महापालिकेच्या निवडणुका कधी होणार, याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष आहे. परंतु आता शिंदे सरकार नव्याने प्रभाग रचना तयार करणार असल्याचे समजते. त्यासंबंधी नगर विकास विभागाने आदेशही जारी केले आहेत. त्यामुळे आगामी मनपा निवडणुका कोणत्या प्रभाग रचनेनुसार होणार, हे पाहणे खूप महत्वाचं होणार आहे. याचा मोठा परिणाम मुंबई महानगरपालिकेसह इतर पालिकांवरही पडू शकतो.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या २ वर्षांपासून प्रलंबित आहेत. यातच नवी मुंबई, औरंगाबादच्या निवडणुका दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून, तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारीपासून प्रलंबित आहे. यातच अनेक ठिकाणी प्रशासक पालिकेचे कामकाज सांभाळत आहेत. या सगळ््या संदर्भात सुप्रीम कोर्टातही केस सुरू आहे. त्यातच आता शिंदे सरकारने नव्याने प्रभाग रचना करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समोर आले आहे.
शिंदे सरकारने एकीकडे निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, यासंदर्भात सध्या सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. सध्या जैसे थेचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र, निवडणुका घेण्याचा आदेश दिला आणि आधीची प्रक्रिया मान्य केली, तर २ आठवड्यांतही निवडणूक होऊ शकते. मात्र, शिंदे सरकारला सगळी नव्याने रचना करायची असेल, तर त्यात अधिकचा कालावधी लागू शकतो.
सुप्रीम कोर्टात पुढील
आठवड्यात सुनावणी
प्रभाग रचनेसंदर्भात नगर विकास खात्याने आज नव्याने आदेश जारी केला आहे. आजच्या आदेशानंतर पालिका निवडणुकीसंदर्भात सरकारचा काय हेतू आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील आठवड्यात हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर मांडण्यात येणार आहे. त्यावेळी यावर पुन्हा युक्तिवाद होऊ शकतो.