
महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार
मुंबई,दि.८ : महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तसेच महानिर्मितीकडून भाग भांडवल उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. १८७ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी तसेच ३९० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी दोन स्वतंत्र प्रस्तांवाना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
१८७ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यास मंजूरी दिली आहे. मौजे कौडगाव, जिल्हा उस्मानाबाद येथे ५० मे.वॅ. क्षमतेचा, मौजे सिंदाला (लोहारा), जिल्हा लातूर येथे ६० मे.वॅ. क्षमतेचा तसेच औष्णिक विद्युत केंद्रामधील वापरात नसलेल्या जागेवर भुसावळ येथे २० मे.वॅ., परळी येथे १२, कोरडी येथे १२, व नाशिक ८ मे.वॅ. असे एकूण ५२ मे.वॅ. क्षमतेचे आणि मौजे शिवाजीनगर, साक्री जिल्हा धुळे येथे २५ मे.वॅ. क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प असे एकूण १८७ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
महानिर्मिती इंजिनीयरींग – प्रोक्युरमेंट अॅण्ड कन्स्ट्रक्शन तत्वावर वाशिम जिल्ह्यातील मौजे दुधखेडा, मौजे परडी ता. कमोर, मौजे कंझारा येथे अनुक्रमे ६० मेगावॅट, ३० मेगावॅट व ४० मेगावॅट असे एकूण १३० मेगावॅट क्षमतेचे तसेच वाशिम-१ प्रकल्पांतर्गत मौजे बाभूळगांव व मौजे सायखेडा येथे प्रत्येकी २० मेगावॅट असे एकूण ४० मेगावॅट क्षमतेचे तसेच वाशिम-२ प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात मौजे कचराळा येथे १४५ मे.वॅ. क्षमतेचा तर यवतमाळ जिल्ह्यात मौजे मंगलादेवी, मौजे पिंपरी इजारा व मौजे मालखेड येथे प्रत्येकी २५ मेगावॅट असे एकूण ७५ मेगावॅट क्षमतेचे असे एकंदरीत ३९० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.