January 22, 2022

महात्मा बसवेश्वर आणि महाराष्ट्र : एक अनुबंध

Read Time:9 Minute, 28 Second

महात्मा बसवेश्वर हे दक्षिण भारताचे बुद्ध म्हणून संबोधले जातात. समग्र क्रांतीचे उद्गाते म्हणून दक्षिण भारत म. बसवेश्वरांकडे पाहतो. दक्षिण भारतातील बहुतांश संप्रदाय आणि पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीवर म. बसवेश्वरांच्या क्रांतिकारी विचारांचा आणि कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव जाणवतो.

या देशातील इतर प्रांतांच्या तुलनेत महाराष्ट्रावर म. बसवेश्वरांचा अधिक प्रभाव जाणवतो. म. बसवेश्वरांच्या कारकीर्दीचा आरंभ महाराष्ट्रात झाला. त्यांना जे ६२ वर्षांचे आयुष्य लाभले त्यापैकी एकवीस वर्षे त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रातील मंगळवेढा येथे होते. म्हणजेच आयुष्यातील एकतृतीयांश काळ म. बसवेश्वर महाराष्ट्रात होते. म. बसवेश्वरांचा अत्यंत उमेदीचा आणि कर्तबगारीचा काळ महाराष्ट्रात गेला. त्यांच्या कल्याण क्रांतीचा कृति आराखडा महाराष्ट्रातच आकाराला आला.

बसवेश्वर मंगळवेढा येथे प्रारंभी राजा बिज्जलाच्या दरबारात करणिक म्हणून रुजू झाले. या मंगळवेढ्याच्या वास्तव्यात आपली बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाच्या बळावर राजा बिज्जलाचे अर्थमंत्री बनले. तेव्हा बिज्जलाचे राज्य महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे परिसरात विस्तारलेले होते. अर्थमंत्री बसवेश्वरांचा या सर्व परिसराशी जवळून संपर्क आला. समाजातील सर्व स्तरांत ते वावरले. संवेदनशीलतेने तत्कालीन समाजातील विदारक वास्तवाचे अवलोकन केले. समग्र क्रांती करून समताधिष्ठित नवीन समाजव्यवस्था उभारणीच्या दृष्टीने सखोल चिंतन करून आपली पुढील वाटचालीची दिशा निश्चित केली.

गंगांबिका आणि निलंबिका या त्यांच्या दोन्ही पत्नी मंगळवेढ्याच्या असल्यामुळे बसवेश्वर महाराष्ट्राचे जावई होते. गंगांबिका आणि निलंबिका या दोघींनी एकदिलाने बसवेश्वरांच्या क्रांतिकार्यात सर्वस्वाने स्वत:ला झोकून दिले. प्रत्येक टप्प्यावर बसवेश्वरांना त्यांनी सावलीप्रमाणे साथ दिली. या दोघींनी आपली वडिलोपार्जित संपत्ती अनुभव मंटपाच्या उभारणीसाठी खर्च केली. बसवेश्वरांच्या कल्याण क्रांतीसाठी विनियोगात आलेली संपत्ती ही एका अर्थाने महाराष्ट्राची होती. कल्याणक्रांतीत गंगांबिका आणि निलंबिका या महाराष्ट्र कन्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्राच्या दृष्टीने गौरवास्पदच आहे.

कल्याण सार्वभौम राज्याचा महामंत्री म्हणून काम करत असताना नवसमाज रचनेच्या दृष्टीने बसवेश्वर रचनात्मक क्रांती करतात. या क्रांतीचा पहिला टप्पा म्हणजे अनुभव मंटपाची उभारणी होय. हे अनुभव मंटप म्हणजे समताधिष्ठित संसदेचे जगातले पहिले प्रारूप होते. देश-विदेशातील विविध जाती, वर्ण आणि वर्गातील ७७० विवेकी व्यक्तींना बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून एकत्रित आणले. यात महाराष्ट्रातील सोलापूरचे शिवयोगी सिद्धरामेश्वर, नांदेड
जिल्ह्यातील कंधारचे उरलिंगदेव, उमराणी इंडीच्या दानम्मा, भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या पंढरपूर जवळील पळूज गावचे शिवशरण अमूगीदेव व रायम्मा हे मराठी शरण अनुभव मंटपाचे सक्रिय सदस्य होते. कल्याण प्रतिक्रांतीनंतर हे शरण महाराष्ट्रात परत येऊन बसवेश्वरांचे क्रांतिकारी विचार जनमनात रुजवण्याचे कार्य केले. बसवकल्याण महाराष्ट्रा लगतच असल्यामुळे इतर प्रांतांच्या तुलनेत महाराष्ट्रावर या कल्याण क्रांतीचा प्रभाव अधिक आहे. महाराष्ट्रातील विविध संप्रदायांच्या पुरोगामीत्वाची बीजं बसवेश्वरांच्या कल्याणक्रांतीत निश्चितच सापडतात.

महात्मा बसवेश्वरांच्या वैचारिक मुळांना फुटलेली पालवी म्हणजे वारकरी संप्रदाय, असे काही अभ्यासक सांगतात. संत नामदेव, ज्ञानदेव आणि एकनाथांप्रमाणे वारकरी संप्रदायाचा वैचारिक कळस ठरलेल्या संत तुकारामांचे अभंग आणि महात्मा बसवेश्वरांची वचने यातील विचाराचा धागा एकच आढळतो. संत तुकारामांच्या गाथेत एका ठिकाणी ‘बसवण्णाची आण’ असा उल्लेख सापडतो. बाराव्या शतकात महाराष्ट्रा लगत बसवेश्वरांची चित्तथरारक कल्याण क्रांती घडल्यानंतरच तेराव्या शतकात महाराष्ट्रात वारकरी चळवळ आकाराला आली. वर्तमानाच्या प्रत्येक घटनेची बीजे गतकाळातील इतिहासात दडलेली असतात. प्रत्येक नवी पिढी ही जुन्या पिढीच्या खांद्यावर असते. यादृष्टीने विचार केला तर बसवेश्वरांच्या क्रांतिकारी विचारांचे वेगळ्या स्वरूपात झालेले पुनरुज्जीवन म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची चळवळ होय. वारकरी संप्रदायाच्या संतांनी अखंडितपणे मराठी मनात जी परिवर्तनवादी विचारांची रुजवणूक केली, त्याचे फलित म्हणजे फुले, शाहू, आंबेडकरांसारखे विश्ववंद्य महापुरुष या महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण झाले.

महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत संतकवीच्या दृष्टीने म. बसवेश्वर एक अखंडित ऊर्जास्रोत आहेत. संतकवी रामलिंग, सुजात, महालिंग वाणी, उद्धवलिंग यांच्या स्फूट रचनेतून बसवेश्वरांचे पुरोगामी विचार प्रकटले आहेत. शिखर शिंगणापूरच्या शांतलिंग स्वामींच्या ग्रंथातून अनेक ठिकाणी अप्रत्यक्षपणे बसवेश्वरांचे विचार अभिव्यक्त झाले आहेत. शं. गो.साखरपेरकरांनी ‘महाराष्ट्रातील बसवेश्वर’ म्हणून शिवयोगी मन्मथ स्वामींचा गौरव केला आहे. शिवयोगी मन्मथ स्वामी आपल्या ‘परमरहस्य’ या ग्रंथात ‘मी बसवेश्वरांच्या पाळण्यातील तान्हुला बाळ’ असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. ‘परमरहस्य’ ग्रंथात पदोपदी बसवेश्वरी वचन साहित्याच्या प्रभावखुणा दिसतात. भाष्यग्रंथाच्या तुलनेत मन्मथ स्वामींचे अभंग वचन साहित्याच्या अधिक जवळ जातात. याबरोबरच मन्मथ परंपरेतील लिंगेश्वर, बसवलिंग, लक्ष्मण महाराज आष्टीकर, शिवदास स्वामी यांच्या अभंगांवर बसवेश्वरांच्या वचन साहित्याचा प्रभाव जाणवतो.

महात्मा बसवेश्वरांच्या परिवर्तनवादी पुरोगामी विचाराचा जेवढा प्रभाव कर्नाटकावर पडला त्यापेक्षा कितीतरी पट अधिक प्रभाव महाराष्ट्रावर पडला. म्हणून महाराष्ट्रातील विविध संप्रदायांचे संत साहित्य, येथील पुरोगामी परिवर्तनवादी चळवळी आणि सांस्कृतिक आंदोलने या बाबी यथार्थपणे समजून घेण्यासाठी
म. बसवेश्वर अगोदर समजून घेणे आवश्यक ठरते.

डॉ. रवींद्र बेम्बरे
वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर. मोबा.: ९४२०८ १३१८५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + 17 =

Close