महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच सावरकरांच्या दया याचिका

Read Time:3 Minute, 27 Second

नवी दिल्ली : हिंदुत्वाची मांडणी करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्याच सूचनेवरून अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, असे वादग्रस्त वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सावरकरांचे योगदान काही ठराविक विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले असून ते आता सहन केले जाणार नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते. उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेले हे पुस्तक रूपा पब्लिकेशन्सने प्रकाशित केले असून आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

या प्रकाशन समारंभाला राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित होते. भागवातांनी देखील सावरकरांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. भागवत यावेळी म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर कठोरपणे बोलायचे म्हणूनच लोकांचा गैरसमज झाला. मात्र, जर संपूर्ण भारत त्यांच्यासारखे बोलला असता तर भारताला फाळणीला सामोरे जावे लागले नसते, असे देखील ते ठामपणे म्हणाले. मोगल सम्राट औरंगजेब यांच्यासारख्या व्यक्तींच्या नावे रस्त्यांना देऊ नयेत या मताशीही ते सहमत होते असेही भागवत यांनी म्हटले आहे.

सुटकेसाठी याचिका दाखल केल्या नाहीत
राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, सावरकरांच्या विरोधात खूप खोटे पसरवले गेले आहे. वारंवार हे सांगितले गेले आहे की, त्यांनी इंग्रजांसमोर अनेकदा क्षमायाचना करत मर्सी पिटीशन्स दाखल केल्या. मात्र वास्तव हे आहे की, या मर्सी पिटीशन्स त्यांनी स्वत:च्या सुटकेसाठी दाखल केलेल्या नव्हत्या. सामान्यत:च एखाद्या कैदीला असा अधिकार असतो की, त्याची इच्छा असेल तर तो मर्सी पिटीशन दाखल करु शकतो. महात्मा गांधींनीच त्यांना सांगितले होते की तुम्ही मर्सी पिटीशन्स दाखल करा. त्यांच्या सांगण्यावरुनच सावरकरांकडून या पिटीशन्स दाखल करण्यात आल्या. गांधीनी असे म्हटले होते की, ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील, असे राजनाथ सिंह म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × two =