January 21, 2022

मराठी रंगभूमी दिन जल्लोषात साजरा

Read Time:4 Minute, 45 Second

५ नोव्हेंबर १८४३ रोजी विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे नाटक पहिल्यांदा रंगमंचावर आणले म्हणून हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून दयानंद कला महाविद्यालयाने अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सरचिटणीस रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी रंग कलेचे या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मराठी रंगभूमी दिन साजरा केला.

गण, गवळण, गोंधळ, पोवाडा, लावणी, मिमिक्री, शिवगीत, प्रहसन अशा विविध कला प्रकारांनी हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संचालक विनोद कुचेरिया, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, विनोदवीर बालाजी सुळ, अधीक्षक नवनाथ भालेराव, सौ. जयमाला गायकवाड याच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक गणाने झाली त्यानंतर जान्हवी पाटील व प्रियंका बनसोडे यांनी गवळण ह्या प्रकारचे सादरीकरण केले. गीतकार – संगीतकार राजन सरवदे यांनी पारंपरिक गोंधळ सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळविली. नृत्यांगना स्रेहा श्ािंदे हिने ‘उंच माडी वरती चला… ही पारंपारिक लावणीच्या अदाकारीने कलाक्षेत्रात कम-बॅक केला. शाहीर अधिराज जगदाळे याने आपल्या पहाडी आवाजात वीर रसाने ओतप्रोत भरलेला शिवजन्माचा पोवाडा सादर करून रसिक श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे केले. सुमीत हसाळे याने विविध चित्रपट कलावंत व राजकीय व्यक्तींचे हुबेहूब नक्कल करून मिमिक्री सादर केली व रसिकांमध्ये हशा पिकविला.

सिने अभिनेत्री तनूजा शिंदे हिने ‘नटले तुमच्यासाठी..’ ही शृंगाररसपूर्ण लावणी विविध भावमुद्रा व अभिनयाने पेश करून कार्यक्रमाची रंगत वाढविली तिला सुरज साबळे यांनी तेवढीच तोलामोलाची ढोलकीची साथ संगत करून रसिकांची वाहवा मिळविली. ज्योतीबा बडे लिखित व दिग्दर्शित प्रहसनाद्वारे कोरोना लसीकरणासाठी प्रबोधनात्मक संदेश दिला व कलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. यात सुदाम साठे, श्रीनिवास बरीदे, आकाश कुलकर्णी, अनंत खलुले, अनमोल कांबळे यांनी उस्फुर्त अभिनय सादर केला. प्रा. शरद पाडे, प्रियंका बनसोडे, पूजा माळी यांनी गायनाची बाजू सांभाळली. राजन सरवदे यांनी मर्द मराठ्याच पोर हे शिव गीत सादर करून वातावरण शिवमय करून टाकले.

कार्यक्रमाची सांगता सर्व कलावंतांनी सादर केलेल्या महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने झाली.डॉ. देवेंद्र कुलकर्णी व डॉ. संदीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला. विनोद वीर बालाजी सूळ यांनी सूत्रसंचलनाची बाजू भक्कमपणे सांभाळली.सूरज साबळे यांनी वाद्यवृंद संयोजन आणि मंचावरील नैपथ्य केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दिलीप जगताप, पर्यवेक्षक डॉ. मिलिंद माने, डॉ. प्रशांत मान्नीकर, डॉ. सुनिता सांगोले आदी उपस्थित होते. लखन सुरवसे, गोविंद कांबळे यांनी पडद्यामागची बाजू सांभाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − 12 =

Close