January 21, 2022

मराठवाड्यात पावसाचा जोर कायम

Read Time:3 Minute, 49 Second

मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असून, बुधवारी रात्री आणि गुरुवारी दिवसभर अनेक भागात पावसाने हजेरी लावली. रात्रीदेखील लातूरसह अनेक भागात पावसाचा जोर अधिक होता. औरंगाबाद, जालन्यासह बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणात पाण्याचा ओघ वाढल्याने १० दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. दरम्यान, जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात पुराचा अंदाज न आल्याने पुलावरून बस वाहून गेली. या बसमध्ये २५ प्रवासी होते. मात्र, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड, सोयगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तसेच इतरत्रही पावसाने दमदार हजेरी लावली. जालना जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू असून, नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच शेत शिवारातही पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे खरीप पिके संकटात सापडली आहेत. बीड, परभणी, हिंगोली, नांदेडमध्येही आज पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी, ओढे तुडुंब भरून वाहात आहेत. तसेच प्रकल्पदेखील १०० टक्के भरल्याने अनेक प्रकल्पांतून पाणी सोडावे लागत आहे. मांजरा नदीवरील धनेगाव धरणाचे दरवाजेही काल उघडावे लागले होते. त्यामुळे मांजरा नदीला पूर आला आहे. लातूर जिल्ह्यातही दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, सायंकाळनंतर जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत लातूर शहरासह जिल्ह्यात ब-याच भागात पाऊस सुरूच होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यातच उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असल्याने निम्न तेरणा प्रकल्प तुडुंब भरला आहे.

अर्धापुरात मुलासह बैलगाडी गेली वाहून
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव (म.) येथील आसना नदीत बैलगाडीसह १६ वर्षीय मुलगा पुरात वाहून गेल्याची घटना दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. यात बैलगाडी आणि मृतावस्थेत दोन बैल सापडले असून मुलगा अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. आसना नदीच्या पाण्याचा प्रवाहात वाढ होत असतानाच पिंपळगाव ( म.) येथील निवृती बालासाहेब देशमुख यांच्या शेतातील सालगड्याचा मुलगा सुदर्शन इरबाजी झुंजारे नदीतून बैलगाडीसह रस्ता ओलांडत होता. त्यावेळी तो बैलगाडीसह वाहून गेला. त्यानंतर पिंपळगाव शिवारात आसना नदी काठावर गाडी आणि मृतावस्थेत दोन बैल सापडले. मात्र, मुलगा बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 5 =

Close