मराठवाड्यात पावसाचा कहर

Read Time:6 Minute, 47 Second

औरंगाबाद/लातूर : मराठवाड्यात अगोदरच मुसळधार पाऊस झाला. त्यातच आता बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ सुरू झाल्याने राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून, मराठवाड्यातही पुन्हा मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी सरींवर सरी कोसळत आहे, तर काही ठिकाणी तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या ओसंडून वाहात असून, नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरीचे ८ दरवाजे उघडले. तसेच बीड जिल्ह्यातील मांजराचे दरवाजेही पुन्हा उघडण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातही निम्न दुधना, येलदरीचे दरवाजे उघडावे लागले. गोदावरीसह कयाधू, मांजरा व मराठवाड्यातील इतर नद्या ओसंडून वाहात असल्याने नदीकाठावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच शेत शिवारातही पाणी थांबल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात अगोदरच जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे तलाव, सर्व प्रकल्प तुडुंब भरले होते. त्यातच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सुरू झाल्याने पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होते. दुपारपासून सर्वत्र पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या आधून-मधून जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. मागच्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाले ओसंडून वाहात असून, शेतशिवारातही सर्वत्र पाणी थांबल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, नद्या, नाले ओसंडून वाहात आहेत. जालना जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील दुधना मध्यम प्रकल्प, वाल्हा येथील सोमठाणा प्रकल्प, राजेवाडी येथील लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातही रविवारी दुपारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र सरीवर सरी कोसळत होत्या. अगोदरच सर्व प्रकल्प तुडुंब भरले असून, नद्या ओसंडून वाहात असताना पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने विष्णुपुरीचे संध्याकाळपर्यंत एकूण ८ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी तुडुंब भरून वाहात आहे. लातूर जिल्ह्यातही दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून, रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. हिंगोली जिल्ह्यातही कयाधू नदी तुडुंब भरून वाहात आहे. तसेच शेतातही पाणीच पाणी झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आकाश भरून आले होते. मात्र, रात्रीपर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती. परभणी जिल्ह्यात पावसाने अक्षरश: कहर केला असून आज दुपारी १ पासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे लोअर दुधना प्रकल्पाचे ८, येलदरीचे २ आणि गोदावरीवरील ढालेगाव बंधा-याचेही दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी, दुधना, पुर्णा या तिन्ही नद्या सध्या ओसंडून वाहात आहेत.

बीड जिल्ह्यात ३७ गावांचा संपर्क तुटला
बीड जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यातच शनिवारी रात्री धुवॉंधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मांजरा, सिंदफणा, मनकर्णिका, बिंदूसरा, कुंडलिका, सरस्वती या नद्या दुथडी भरून वाहात आहेत. तसेच माजलगाव आणि मांजरा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे वडवणी तालुक्यातील ३७ गावांचा संपर्क तुटला आहे. माजलगाव, बीड, वडवणी, शिरूर तालुक्यामध्ये ढगफुटीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पिकांची प्रचंड हानी
खरीप हंगामातील सोयाबीनसह अन्य पिके जोमात आलेली असतानाचा मागच्या काही दिवसांपासून पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. त्यामुळे अगोदर पिकांना पाणी लागलेले असताना जारदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, उद्ध्वस्त झाले आहेत. सोयाबीनच्या शेंगाला तर अक्षरश: कोंब फुटत असल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने सोमवारी पुण्यासह नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोली या ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोमवारी या भागात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मंगळवारीही जोरदार पाऊस पडू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − seven =