January 21, 2022

मराठवाड्यात दमदार; प्रकल्प तुडुंब, खरीप पिके संकटात

Read Time:3 Minute, 24 Second

नांदेड/लातूर : राज्यात ब-याच भागात पुन्हा पाऊस सुरू झाला असून, बुधवारी मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. एक तर दिवसभर आकाशात ढग दाटून आल्याने अनेक भागात आधून-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, सायंकाळी लातूर, उस्मानाबादसह मराठवाड्यातील ब-याच भागात पावसाने दमदार हजेरी लावली. तसेच बीड, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातही दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. तसेच औरंगाबाद, जालना जिल्ह्यातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रकल्प जवळपास तुडुंब भरले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली. मात्र, सततच्या पावसामुळे शेतशिवारात पाणी साठले असून, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली, तर काही ठिकाणी पाणी लागल्याने पिकांची नासाडी होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मराठवाड्यात मागच्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होते. त्यामुळे ब-याच भागात सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत होत्या. लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात दिवसभर आधून-मधून सरी कोसळत होत्या. त्यातच लातूर जिल्ह्यात सायंकाळी ७ च्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे नाले, रस्ते तुडुंब भरून वाहू लागले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातही दिवसभर जोरदार सरी कोसळत होत्या. तसेच रात्रीही जोरदार पाऊस झाला. याशिवाय औरंगाबाद, जालना जिल्ह्यातही कालपासून दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, नाले तुडुंब भरून वाहात आहेत.

शेतकरी धास्तावला
मराठवाड्यात दमदार पाऊस कोसळत आहे. परतीचा पाऊस लांबल्याने पुढील १० दिवस पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेले सोयाबीनचे पीक पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अगोदरच सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगांची वाढ खुंटली आहे. त्यात पावसाचा जोर वाढल्यास जागेवरच पिकांचे नुकसान होण्याचा धोका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 18 =

Close