August 9, 2022

ममता बॅनर्जींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Read Time:2 Minute, 50 Second

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल जगदीप धनखड यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरुन ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राजभवनात छोटेखानी समारंभात राज्यपाल धनखड यांनी ममता बॅनर्जींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ममता बॅनर्जी यांच्या शपथविधीसाठी पार्थ चॅटर्जी, सुव्रत मुखर्जी हे तृणमूल काँग्रेसचे नेते,निवडणुक रणनीतीकार प्रशांत किशोर, अभिषेक बॅनर्जी हे उपस्थित होते.

कोविड नियंत्रणाला प्राधान्य मुख्यमंत्रीपदाची सूत्रे पुुन्हा हाती घेतल्यानंतर आपली प्राथमिकता कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्याला असेल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या हिंसाचाराला शांत करण्यावरही त्यांनी जोर दिला.

राज्यपाल, मुख्यमंत्री वाद पुन्हा सुरु
शपथविधीनंतर ताबडतोब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वाद सुरु झाले. राज्यातील निवडणुकीनंतरच्या हिंसाचारावर राज्यपाल धनखड यांनी भाष्य केले. भारतात लोकशाही आहे, इथे सरकार कायद्यानुसार चालते.निवडणुकीनंतर राज्यात सुरु झालेला हिंसाचार लोकशाहीसाठी धोकादायक आहे, माझी लहान बहीण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावर कारवाई करतील, असे धनखड यांनी म्हटले आहे.

त्यावर ममता बॅनर्जींनी लगेच प्रत्युत्तर दिले आहे. तीन महिन्यांपासून राज्यातील संपूर्ण सरकार निवडणूक आयोगाच्या हाती होते. आयोगाने अधिकाºयांच्या नियुक्त्या केल्या. पण त्यांनी काही काम न केल्याने ही वेळ आली. आता आमचे सरकार शांतता निर्माण करेल, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

20 − 6 =

Close