
मनपांची रणधुमाळीही लवकरच!
१४ मनपांच्या आयुक्तांना निवडणूक आयोगाचे पत्र
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यात येत आहे. राज्यातील १४ महापालिकांच्या आयुक्तांना राज्य निवडणूक आयोगाने पत्र लिहिले आहे. महापालिका आयुक्तांनी निवडणूक पूर्वकामांचा भाग म्हणून वार्डनिहाय मतदार यादी ७ जुलैपर्यंत तयार करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने या संदर्भात २ जूनला परिपत्रक काढले आहे. एक प्रकारे राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया जुलै ते ऑक्टोबर महिन्यामध्ये राबवण्यात येईल, असे संकेत दिले आहेत. राज्यातील १४ महापालिकांचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पहिल्यांदा निवडणुकांच्या तारखांसदर्भात संकेत दिले आहेत. १८ मे रोजी सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला ज्या ठिकाणी मान्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी असते, त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया राबवावी आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त असतो, तिथे पावसानंतर निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. राज्य निवडणुक आयोगाने त्यावेळी भारतीय हवामान विभागाशी आणि स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करुन निवडणुकांच्या तारखा जाहीर करू, असे म्हटले होते.
३१ मेपूर्वी नोंदवलेली
नावे मतदार यादीत
राज्य निवडणूक आयोगाने ३१ मे ही तारीख मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी अंतिम मुदत म्हणून जाहीर केली होती. यानुसार ३१ मे पूर्वी ज्यांनी नाव नोंदवली आहेत, त्यांच्या नावांचा समावेश मतदार यादीत केला जाईल, असे सांगण्यात आले.
या १४ महापालिकांमध्ये निवडणूक
मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत.