मदतीसाठी टाहो फोडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Read Time:3 Minute, 7 Second

हिंगोली : वारंवार विनंत्या, मागणी करूनही रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाहीत… अनेकांशी संपर्क साधूनही कसलीही मदत पोहचत नाही… मी रुग्णालयाच्या टेरेसवर जावून माझा जीव देत आहे…अशी क्लिप आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे लक्ष वेधण्याकरिता व्हायरल केली होती. ऑडीओच्या माध्यमातून मदतीसाठी टाहो फोडणाऱ्या पोलीस कर्मचारी सचिन इंगोले यांचे गुरूवारी (दि.२९) कोरोनाशी झुंज देताना दु:खद निधन झाले. दरम्यान मयत पोलीस कर्मचारी इंगोले यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी मदतीसाठी साधलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप दोन दिवसापुर्वीच सोशल मीडियात व्हायरल झाली होती.

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत सचिन इंगोले याना कोरोना झाला होता. त्यांच्यात येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपुर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना उद्देशून पोलीस दल व रुग्णालय प्रशासनाला मदत मागता मागता माझा जीव जात आहे, माझ्यावर योग्य उपचार होत नाहीत, मी नेकांशी संपर्क साधला, माझ्याकडे एक रुपयाही नाही, तुम्ही सर्वजण फक्त येतो म्हणत आहात; मात्र कुणीही येत नाही. साहेब मी रुग्णालयाच्या टेरेसवरून माझा जीव देत आहे, मला श्वासनाचा खून त्रास होत आहे. माझे वडील रुग्णालयात भरती आहेत…असे पोलीस कर्मचारी इंगोले यांनी दोन दिवसांपुर्वी ऑडिओ क्लिपद्वारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.

२९ एप्रिलला कोरोनाशी झुंज देताना पोलीस कर्मचारी सचिन इंगोले यांचे निधन झाले. सध्या गोरेगाव येथे त्यांची नेमणूक होती. यापूर्वी त्यांनी हिंगोली शहर ठाण्यात कर्तव्य बजावले होते. शहरातील बस स्थानकातील चोरीच्या घटनांना त्यांनी चाप बसविला होता. कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. इंगोले यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × 2 =