May 19, 2022

…मग ७५८ नापास का?

Read Time:10 Minute, 56 Second

अपेक्षेप्रमाणे राज्य परीक्षा मंडळाने शालान्त परीक्षेचा निकाल लावण्याचे पुण्य कर्म पार पाडल्याने परीक्षा मंडळ, शाळा, विद्यार्थी, पालक आणि कर्तेधर्ते राज्य सरकार असे सगळ्यांचेच घोडे गंगेत न्हावून पावन झाले आहेत. ज्या मूल्यमापनाचा आधार परीक्षा मंडळाने सरकारच्या निर्देशानुसार घेतला तोच मुळात निव्वळ सारवासारवीचाच प्रयत्न होता. नियोजनशून्य कारभाराने पुरते नाकातोंडात पाणी जाऊन जीव जाण्याची वेळ आल्यावर बुडत्याला दुस-याच्याच काडीचा अचानक आधार मिळावा आणि त्याचा जीव वाचावा, असाच हा प्रकार! परीक्षा रद्द केल्या मग निकाल कसा लागणार? हे कोर्टाने खडसावून विचारेपर्यंत महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाला साधा त्यावर विचार करण्याचीही गरज वाटलेली नव्हती. मग त्याबाबत ठोस नियोजन वगैरे तयार असणे लांबच! त्यामुळे न्यायालयासमोरच्या परीक्षेत राज्य परीक्षा मंडळ व त्याचे कर्तेधर्ते सरकार अगोदरच नापास झाले होते.

परीक्षेशिवाय निकालाचे सूत्र त्यामुळेच परीक्षा मंडळाला न्यायालयासमोर सांगता येणे अशक्यच होते. मात्र, नशीब बलवत्तर असले की, नापासचीच गॅरंटी असलेल्या विद्यार्थ्यांच्या समोर एखाद्या स्कॉलर विद्यार्थ्याचा नंबर परीक्षेत येतो आणि तो उदार अंत:करणाने आपली अख्खी उत्तरपत्रिका कॉपीसाठी उपलब्ध करून देतो. असा चमत्कार घडल्यावर जसा त्या ‘गॅरंटी’वाल्या विद्यार्थ्याचा सुखद धक्का देणारा निकाल हाती पडतो तसाच प्रकार राज्य परीक्षा मंडळाच्या बाबतीत घडला. केंद्रीय परीक्षा मंडळाने परीक्षेशिवाय निकाल कसा जाहीर करता येईल याचे सूत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आणि राज्य परीक्षा मंडळाची लॉटरी फुटली. त्यांनीही आमचेही हेच उत्तर, असे दणक्यात सांगितले. त्याने परीक्षा मंडळ ‘पास’ होण्याचा चमत्कार आपल्या नावे नोंदविण्यात यशस्वी झाले असले तरी प्रत्यक्षात हा सगळा ‘फार्स’च ठरतो कारण आता ज्या अंतर्गत मूल्यमापनाचा आधार घेऊन दहावीचा महापराक्रमी, विक्रमी निकाल लावण्यात आलाय तेच अंतर्गत मूल्यमापन करू नका, असा स्पष्ट आदेश राज्याच्या शिक्षण खात्याने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अत्यंत स्पष्टपणे शाळांना दिला होता.

शाळांमधील चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा काटेकोरपणे घ्याव्यात असा कुठलाही स्पष्ट आदेश वर्ष सुरू होताना शाळांना देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या परीक्षांबाबतची आपली पूर्वापार परंपरा सोडून राज्यातील शाळांनी त्याबाबत आत्मसाक्षात्काराने प्रचंड गंभीर वगैरे होण्याचे कारणच नव्हते. थोडक्यात काय तर जर आडातच नाही तर पोह-यात येणार कुठून? हीच स्थिती! अशा स्थितीत राज्यातील शाळा व शाळांच्या शिक्षकांचीच खरी परीक्षा होती! त्यांनाच आपली कार्यकुशलता सिद्ध करून निकाल नामे प्रक्रियेसाठीची कागदोपत्री जुळवाजुळव करायची होती. दहावीचा या वर्षीचा ‘न भूतो न भविष्यति’ असा महाविक्रमी ९९.९५ टक्के निकाल लावून राज्यातील शाळा, शिक्षक व राज्य परीक्षा मंडळाने आपली ‘जुगाडा’ची अतुलनीय क्षमता सिद्ध केलीय, याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

त्यामुळेच निकालानंतर प्रथम प्राधान्याने विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, शाळांचे व पालकांचे अभिनंदन करण्याची जी क्रमवारी आहे त्यात आता बदल करून शिक्षक, शाळा, परीक्षा मंडळ, शिक्षण खाते व या सगळ्यांचे कर्तेधर्ते मायबाप सरकार यांचे सर्वांत प्रथम प्राधान्याने अभिनंदन करावे लागेल! ज्या परीक्षा मंडळाकडे प्रश्नाचे उत्तरच नव्हते त्या परीक्षा मंडळाने अनाहुत सापडलेल्या कॉपीच्या आधारे निष्णात व अभ्यासू विद्यार्थ्यापेक्षाही प्रचंड वेगाने उत्तर देण्याची विक्रमी किमया केली आहे. ही राज्यातील शिक्षण क्षेत्राची अफलातून कार्यक्षमता व कुशलता सृष्टीनिर्मात्यालाही थक्क करणारी व आश्चर्याच्या धक्क्याने बेशुद्ध पाडणारीच आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम जनतेने कृतकृत्य होऊन त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करायलाच हवे, किंबहुना हे जनतेचे आद्य कर्तव्यच! राहता राहिला या निकालाद्वारे उत्तीर्ण झालेल्या राज्यातील ९९.९५ टक्के विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या अभिनंदनाचा प्रश्न! प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे त्यांचे अभिनंदन करणे क्रमप्राप्तच.

मात्र, ते अभिनंदन करताना त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा कशा द्याव्यात? हा खरा प्रश्न! त्याहीपेक्षा या यशवंती निकालाच्या त्सुनामीतही परीक्षा मंडळाने ज्या ७५८ अभागी व फुटक्या नशिबाच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याची जी विवेचक बुध्दी दाखविली आहे त्यांचे व त्यांच्या पालकांचे कसे सांत्वन करावे? हाच या महाराष्ट्रासमोर सध्याच्या घडीचा सर्वांत मोठा यक्षप्रश्न! या ७५८ पामरांनी नेमके कोणते व कुणाचे घोडे मारले? म्हणून बिचा-यांना परीक्षाच झालेली नसतानाही ‘नापास’ व्हावे लागले! शाळांनी या विद्यार्थ्यांचा अहवाल परीक्षा मंडळाकडे पाठवूनही परीक्षा मंडळाने त्यांना नापास केले! ९९.९५ टक्के विद्यार्थ्यांना विक्रमी गुणांनी पास करताना राज्यातील शाळांवर धृतराष्ट्राप्रमाणे आंधळा विश्वास दाखविणा-या परीक्षा मंडळाला या ७५८ विद्यार्थ्यांबाबतच नेमकी कोणती दिव्यदृष्टी प्राप्त झाली की, त्यामुळे ते बिचारे परीक्षा मंडळाच्या कृपेला पारखे झाले? हा या घडीचा सर्वांत मोठा प्रश्नच! त्याचे अचूक व शास्त्रीय उत्तर परीक्षा मंडळ देईल व राज्याच्या मनातील शंकेचे योग्य निरसन करेल, ही भाबडी आशा! बहुधा आपल्या परमप्रिय लेकराला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून आई जसे बाळाला गंध-पावडर केल्यावर गालावर काळी तिट लावते त्याप्रमाणेच परीक्षा मंडळाने आपल्या महाविक्रमी निकालाला दृष्ट लागण्याच्या भीतीने ७५८ पामरांना अनुत्तीर्ण करत काळी तिट लावण्याचे कर्तव्य पार पाडले असावे! असो!! झाले गेले गंगेला मिळाले म्हणून या निकालाचे स्वागतही करता येईल.

(शिक्षणप्रेमी महाराष्ट्रात हाच मतप्रवाह सध्या जोरात आहे) मात्र, तसे स्वागत करतानाही या यशवंत विद्यार्थ्यांचे पुढे काय? हा अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न आहेच आणि सध्याच्या घडीला या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही. ना यंत्रणेकडे, ना शिक्षण खात्याकडे, ना सरकारकडे! शिक्षण खाते, परीक्षा मंडळ व सरकार यांच्या कृपादृष्टीने लागलेल्या यंदाच्या महाविक्रमी निकालात एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत म्हणजे ही संख्या १६ लाखांच्या आसपास होते. त्यांना पुढील प्रवेशासाठी म्हणजे ११वीच्या सर्व शाखा, पदविका अभ्यासक्रम, आयटीआयसारखे कौशल्य अभ्यासक्रम या सगळ्यांच्या सध्या उपलब्ध जागा एकत्रित करूनही प्रवेश मिळेल का? हाच आता मोठा प्रश्न आहे. आकडेवारी तपासली तर त्याचे उत्तर या घडीला तर ‘नाही’हेच येते! मग जर पुढील प्रवेशाच्या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे येण्याची कुठलीच व्यवस्था सरकार करत नसेल, तशी इच्छाशक्तीही दाखवत नसेल तर मग हा सगळा अट्टाहास आहे कशासाठी? हाच प्रश्न उरतो, हे मात्र निश्चित!

Leave a Reply

Your email address will not be published.

six − 4 =

Close