
मंगरूळच्या शेतक-याकडून गायीचे डोहाळजेवण
जळकोट : प्रतिनिधी
शेतक-यांचे आपल्या शेतीवर तसेच शेतीला मदत करणा-या पाळीव प्राण्यावर खूप प्रेम असते. काही शेतकरी तर पाळीव प्राण्यावर आपल्या मुला पेक्षा जास्त प्रेम करतात. असाच एक जळकोट तालुक्यातील मंगरूळ येथील शेतकरी असून या शेतक-यांने त्यांच्याजवळ असलेल्या गाईचे चक्क सातव्या महिन्या मध्ये डोहाळे जेवण केले. या निमित्ताने त्यांनी गावांमध्ये जेवणाची पंगत देखील वाढली.
जळकोट तालुक्यातील मंगरूळ येथील शेतकरी विश्वनाथ रामराव सूर्यवंशी यांनी कालवड खरेदी केली होती. यानंतर या कालवडीचे पालन पोषण केले. या कालवडीचा शेतकरी विश्वनाथ सूर्यवंशी यांना खूप लळा लागला. आपल्या मुला प्रमाणे या कालवडीची देखील ते काळजी घेऊ लागले. यामुळे हि कालवड त्यांच्या घरचा साथीदार बनली.
कोणत्याही स्त्रीचा गर्भधारणा हा क्षण तिच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. यासोबतच स्त्रीच्या कुटुंबामधील व्यक्तींसाठी हा आनंदाचा क्षण असतो. एक तर पाचव्या महिन्यामध्ये किंवा सातव्या महिन्या मध्ये डोहाळे जेवण केले जाते. हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, ओटी भरली जाते. फुलांची सजावट, फुलांचा गजरा अशाप्रकारे डोहाळे जेवण साजरी केली जाते. आणि प्रत्येक ठिकाणी असे डोहाळेजेवण साजरे केले जातात हे सर्वांना माहिती आहे.
परंतु जळकोट तालुक्यातील मंगरूळ या गावात एका शेतक-याने चक्क गाईचे डोहाळे जेवण साजरे केले. जसे स्त्रीचे डोहाळे जेवण साजरे करतात. त्याच पद्धतीने दि. २६ नोव्हेंबर रोजी शेतक-याने आपल्या गाईचे डोहाळे जेवण केले. गाईला सरांनी सजवले. गाईला साडी पांघरली, यासोबतच गावक-यांना या डोहाळे जेवणा निमित्त जेवण दिले. यामुळे गाईचे डोहाळे जेवण जळकोट तालुक्यात चर्चेचा विषय बनलेला आहे. एका शेतक-याचे आपल्या पाळीव प्राण्यावर किती प्रेम असते हे यातून दिसून येत आहे.
याप्रसंगी सरपंच मेहताब बेग, बलभीम सूर्यवंशी, गिरीश सूर्यवंशी, व्यंकट कुंडेकर, रवि सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, धोंडीबा सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी यांच्यासह अनेक गावकरी याप्रसंगी उपस्थित होते.