भारत बायोटेक महाराष्ट्राला देणार ६०० रुपये दराने ८५ लाख लशी

Read Time:4 Minute, 55 Second

महाराष्ट्रात येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार असला तरी यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होणे हे एक मोठे आव्हान आहे. आरोग्य विभागाने यासाठी भारत बायोटेक व सीरम इन्स्टिट्यूटला तातडीने लस पुरवठा करण्यासाठी पत्र लिहिले होते. यातील हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने ६०० रुपये दराने ८५ लाख लसीच्या डोसेसचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे तर सीरमने अद्याप उत्तर दिलेले नाही.

केंद्र सरकारने येत्या १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर केला असून, महाराष्ट्रात या वयोगटातील ५ कोटी ७ लाख लोक आहेत. त्यांना एकूण १२ कोटी लसीचे डोसेस द्यावे लागणार असून, केंद्राने जास्तीजास्त लस पुरवठा करावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सीरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक या कोरोना लस निर्मिती करणा-या कंपन्यांना सोमवारी २६ एप्रिल रोजी राज्याच्या आरोग्य विभागाने पत्र पाठवून तातडीने लस पुरवठा करण्याची मागणी केली होती.

भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसीची किंमत केंद्र सरकारसाठी १५० रुपये तर राज्य सरकारांसाठी ६०० रुपये जाहीर केली असून खासगी रुग्णालयांसाठी १२०० रुपये दर जाहीर केला. सीरमने कोव्हिशील्ड लशी साठी केंद्राला १५० तर राज्यांना ४०० रुपये दर जाहीर केला असून खासगी रुग्णालयात ही लस ६०० रुपयात उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसींच्या किमतीवरून महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी तीव्र नाराजी व्यक्त या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांनी आपल्या लसीची किंमत कमी करावी अशी सूचना केंद्र सरकारने भारत बायोटेक व सीरमला केली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने सीरम व भारत बायोटेक कंपनीला लस पुरवठा तात्काळ करण्यासाठी पत्र दिले. या पत्रात किती रुपये दराने लस देणार व पुरवठा कशाप्रकारे करणार अशी विचारणा केली आहे. २६ एप्रिलला पाठवलेल्या या पत्राला भारत बायोटेकने लगेचच दुस-या दिवशी म्हणजे २७ एप्रिलला उत्तर दिले आहे. पत्रात भारत बायोटेकने ६०० रुपये प्रति वायल दराने ८५ लाख कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र हा पुरवठा करण्यासाठी आगाऊ पैसे मागितले आहेत.

तसेच लसींचा पुरवठा हा एकाच ठिकाणी केला जाईल असे म्हटले आहे. मे महिन्यात ५ लाख लसीचा पुरवठा केला जाईल. त्यानंतर जून व जुलै महिन्यात प्रत्येकी १० लाख लसी तर ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी २० लाख लसींचा पुरवठा केला जाईल, असे भारत बायोटेकच्या विक्री विभागाचे प्रमुख एम. सुब्बाराव यांनी आरोग्य विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. ही व्यवस्था तात्पुरती असून, ही कमी किंवा वाढू ही शकते असेही या पत्रात नमूद केले आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनंतर दोन्ही कंपन्यांकडून नवे दरपत्रक जाहीर होऊन किमती कमी होतील अशी अपेक्षा होती. तथापि भारत बायोटेक कंपनीने कोव्हॅक्सिन लसीसाठी ६०० रुपये दर ठेवल्याने लस खरेदीबाबतचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात येऊन पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − nine =