January 21, 2022

भारत बंद यशस्वी, शेतक-यांचा पूर्ण पाठिंबा

Read Time:5 Minute, 3 Second

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतक-यांनी देशभरात सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंदमध्ये शेतक-यांनी वेगवेगळ्या महामार्गांवर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय रेल्वे मार्गही रोखणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले आहे. दिल्लीत या पार्श्वभूमीवर गाझीपूर सीमेवर वाहतूक बंद करण्यात आली आहे.

आमचा भारत बंद यशस्वी झाला. आम्हाला शेतक-यांकडून पूर्ण पाठिंबा होता. आम्ही सगळे काही सील केले नाही. काही महत्त्वाच्या गोष्टी बंद पडू दिलेल्या नाहीत. आम्ही सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे पण चर्चाच होत नाही अशी प्रतिक्रिया भारत किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली.

मुंबईत विरोधक एकवटले
शेतकरी आंदोलनाच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सायन सर्कल येथे निदर्शने केली गेली. सायन सर्कल येथील आंदोलनात काँग्रेसचे नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, राष्ट्रवादी काँंग्रेसचे नवाब मलिक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी, मिलिंद रानडे, शेतकरी कामगार पक्षाचे अ‍ॅड. राजेंद्र कोरडे सहभागी झाले होते.

हरयाणात शेतक-याचा मृत्यू
हरयाणाच्या सिंघु सीमेवर एका शेतक-याचा आंदोलनावेळी मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे. मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव भगेल राम असे आहे. शेतक-याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबतची अधिक माहिती शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल.

तामिळनाडूत बॅरिकेड्स तोडले
कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणा-या शेतक-यांनी तामिळनाडुत पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक तुंबली
संयुक्त किसन मोर्चा कामगार संघटना, संयुक्त कृती समिती जन आंदोलन संघर्ष समिती, महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भारत बंद-जनआक्रोश आंदोलन पिंपरी येथील आंबेडकर चौकात सुरू आहे. या वेळी कामगारांचा तसेच नागरिकांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. यावेळी चौकात वाहतूक कोंडी दिसून येत असून पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.

पुण्यात भारत बंदला प्रतिसाद नाही
कृषी कायद्याविरोधातील भारत बंद आज सुरु आहे. मात्र पुण्यात याला फारसा प्रतिसाद नाही. विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. मंडईतील टिळक पुतळ्यासमोर निदर्शने सुरु असून यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनासुद्धा सहभागी झाले आहेत. मोदी सरकारविरोधात आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी केली.

दिल्ली-एनसीआरमध्ये सर्व ठप्प
शेतक-यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये आम्ही काही सील केलेले नाही. आम्हाला फक्त संदेश द्यायचा आहे. बंदच्या काळात अ‍ॅम्ब्युलन्स, डॉक्टर्स यांच्यासह अत्यावश्यक काम असलेल्यांना सोडण्यात येईल. दुकानदारांना आम्ही आवाहन केले आहे की त्यांनी चार वाजेपर्यंत सर्व बंद ठेवावें. त्यानंतर दुकाने उघडावीत. इथे बाहेरून कोणीही शेतकरी आलेले नाहीत असंही राकेश टिकैत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 − four =

Close