
भारताला देणार २५ कोटी कोरोना लस!
नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने अक्षरश: थैमान घातले आहे. एकवेळ अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान या देशांत कोरोनाने धुमाकूळ घातला होता. मात्र, आता भारतात आता चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिका, ब्रिटन, रशिया, इस्रायलसह इतर छोटे-मोठे देश आपापल्या परीने मदतीसाठी धावून येत असून, आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मदतीचा हात देत आहेत. दरम्यान, गरीब देशांना कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गावी या जागतिक संघटनेने भारताला २५ कोटी कोरोना लसी परवडणा-या किमतीत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी गावीला २२० कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातले, तेव्हा बरेच देश लसीच्या संशोधनाच्या कामात व्यस्त होते. त्यातच लस विकसित होत असताना अनेक श्रीमंत देशांनी अगोदरच लसींचे बुकिंग करायला सुरुवात केली. त्यात श्रीमंत देश आघाडीवर होते. अशा परिस्थितीत गरीब देश किंवा नागरिकांचे काय, असा प्रश्न समोर आला होता. अर्थात, गरीब देश पुरेसा पैसा नसल्याने तसे करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत गरीब आणि मध्यम परिस्थिती असलेल्या देशांनादेखील परवडणा-या दरात लस मिळावी, यासाठी गावी या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली होती. आता ही संघटना भारताला मोठ्या प्रमाणावर लस पुरविणार आहे. ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायझेशन (गावी) असे या संघटनेचे नाव आहे.
गावी तिस-या तिमाहीत भारताच्या सीरमकडून लस मिळेल, या अपेक्षेत होती. मात्र, सीरमला सध्या भारतालाच पुरेशी लस पुरविणे जमत नाही. यामुळे जगासाठी लस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे कोव्हॅक्स अमेरिकेसारख्या श्रीमंत देशाकडून लसींचे दान मागण्याची शक्यता आहे. अमेरिकेने गावीला लस पुरविण्याबाबत शब्द दिला आहे. त्यामुळे लस उपलब्ध करून देण्यात येणार असून, गरीब आणि गरजू देशांची गैरसोय होणार नाही, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाणार आहेत. विशेषत: भारतात दुस-या लाटेत कोरोनाने घातलेले थैमान आणि लसींचा वाढता तुटवडा लक्षात घेता भारताला २५ कोटींवर लस पुरविल्या जातील. मात्र, त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी मदत करावी लागणार आहे, असे गावी या संघटनेचे म्हणणे आहे.
यंत्रणा उभारण्यासाठी २२० कोटी द्यावे लागणार
गावी ही संघटना भारताला तब्बल २५ कोटी कोरोना लसीचे डोस देणार आहे. यासाठी भारताला लस साठविण्याचे, वाहतुकीची यंत्रणा आणि कोल्ड चेन बनविण्यासाठी गावीला २२० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. याबाबतचा निर्णय गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्येच कोव्हॅक्स बोर्डाकडून घेण्यात आला होता. मात्र, तेव्हा सर्व कंपन्यांच्या लसींच्या चाचण्या सुरू होत्या, असेही गावीने म्हटले आहे.
उपलब्ध साठ्याच्या २० टक्के लसी देणार
सध्याचे भारतावरील संकट पाहता गावी मदतीसाठी तयार आहे. कोव्हॅक्स बोर्डाच्या निर्णयानुसार भारताला एकूण उपलब्ध लसीच्या साठ्याच्या २० टक्के लस दिली जाणार आहे. डोसची ही संख्या १९ ते २५ कोटींच्या आसपास असणार आहे. भारत जगाताली आणि प्रमुख लस निर्माता आहे. परंतु सध्या हाच देश कोरोनाच्या मोठ्या लाटेत सापडला आहे. यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे त्यांना कठीण जात आहे, असे गावीच्या प्रवक्त्याने सांगितले.