भारतात मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढणार

Read Time:5 Minute, 22 Second

नवी दिल्ली : वाढत्या मध्यमवर्गासह त्यांच्या वाढत्या विवेकाधीन खर्चामुळे भारत २०५० पर्यंत जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार देश बनेल. जागतिक आयातीत ५.९ टक्के वाटा असलेला भारत चीन आणि अमेरिकेच्या मागे असेल. अर्थात मध्यमवर्गीयांच्या क्रयशक्तीत वाढ होणार असल्यानेच भारत अर्थव्यवस्थेत वेगळी झेप घेईल, असे यूकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या ग्लोबल ट्रेड आउटलुक अहवालात म्हटले आहे.

जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सध्याच्या अनुमानित रँकिंगनुसार भारत २.८ टक्के आयात वाट्यासह सर्वात मोठ्या आयातदार देशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. यानंतर २०३० पर्यंत भारत चौथा सर्वात मोठा आयातदार देश बनेल, असेही या अहवालात म्हटले आहे.आशियातील मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढल्याने अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या आयात क्षेत्रातील वाटा २०३० पर्यंत घटण्याची शक्यता आहे. हा बदल विशेषत: अन्न आणि पेय, प्रवास आणि डिजिटल सेवा क्षेत्रात दिसून आला आहे, असेही यूकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या ग्लोबल ट्रेड आउटलुक अहवालात म्हटले आहे.

२०३० पर्यंत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे चीनचा प्रवास सुरू आहे. जागतिक जीडीपीमध्ये ६.८ टक्के वाटा असणा-या चीन आणि अमेरिकेनंतर २०५० पर्यंत भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत तिस-या स्थानावर जाईल, असे या अहवालात म्हटले आहे. सध्या जगातील अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत भारताचा (३.३ टक्के) पाचवा क्रमांक आहे. २०३० पर्यंत जर्मनीला मागे टाकून भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, चीन, भारत, ब्राझील, रशिया, इंडोनेशिया, मेक्सिको आणि तुर्की या सात सर्वात मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा ई-७ समूह २०५० पर्यंत जागतिक आयात मागणीमध्ये जी-७ समूहांच्या समान होण्याचा अंदाज आहे. जगातील सात सर्वात श्रीमंत देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके आणि अमेरिका यांचा जी-७ समूहात समावेश होतो. जागतिक जीडीपीमध्ये जी-७ चा वाटा २००० मध्ये ६५ टक्के होता. तो आता २०२० मध्ये ४६ टक्क्यांवर आला आहे, तर ई-७ चा वाटा ११ टक्क्यांवरून २८ टक्के झाला आहे.

पुढील तीस वर्षांत ई-७ मध्ये कामगार उत्पादकता वाढ ही जी-७ च्या जवळपास दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. २०३० दरम्यान ई-७ आर्थिक आकारात जी-७ ला मागे टाकेल. तसेच नव्याने उदयास येणा-या अर्थव्यवस्थांनाही मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

अमेरिका, युरोपियन युनियनचा वाटा घटणार
आशिया खंडात अलिकडे मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढू लागल्याचे चित्र आहे. मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती वाढल्यास आयातदार देश म्हणून मोठी झेप घेण्याची संधी आहे. भारतातदेखील आगामी काळात मध्यमवर्गीयांच्या क्रयशक्तीत मोठी वाढ होणार आहे. यातून आयातदार देश म्हणून रँकिंग वाढण्यास मदत होणार आहे. ही क्रयशक्ती वाढत राहिल्यास अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या आयात क्षेत्रातील वाटा २०३० पर्यंत घटण्याची शक्यता आहे.
जागतिक अर्थव्यवस्थांची क्रमवारी
रँक २०१९ २०३० २०५०
१ यूएस चीन चीन
२ चीन अमेरिका यूएस
३ जर्मनी जर्मनी भारत
४ फ्रान्स भारत जर्मनी
५ यूके यूके यूके
६ जपान जपान फ्रान्स
७ नेदरलँड फ्रान्स नेदरलँड
८ भारत नेदरलँड जपान
९ हाँगकाँग हाँगकाँग हाँगकाँग
१० दक्षिण कोरिया कॅनडा व्हिएतनाम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + 7 =