भारतात नोवोवॅक्सचा लहान मुलांना आधार !

Read Time:5 Minute, 4 Second

पुणे : २१ जूनपासून भारतात १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण होणार आहे. त्यातच आता लहान मुलांच्या लसीकरणाबाबतही मोठी बातमी समोर आली असून, लहान मुलांना आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची नोवोवॅक्स लस दिली जाणार आहे. भारतात या लसीच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. नोवोवॅक्सचे जुलैमध्येच लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल करण्याचा सीरमचा विचार आहे. त्यामुळे लहान मुलांसाठीही लवकरच लस उपलब्ध होऊ शकते.
भारतात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला लहान मुलांवर ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली आहे. आता पुण्याची सीरम इन्स्टिट्यूटही लहान मुलांना कोरोना लस देण्याच्या तयारीत आहे.

नोवोवॅक्स लसीचे जुलैमध्येच लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल करण्याचा कंपनीचा विचार आहे, असे सांगण्यात आले. अमेरिकेतील नोवोवॅक्स कंपनीच्या मदतीने सीरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली असून, दोन दिवसांपूर्वीच या लसीच्या तिस-या टप्प्यातील चाचणीचे परिणाम जारी करण्यात आले आहेत. या लसीचे २९,९६० लोकांवर ट्रायल घेण्यात आले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या लसीचा एकूण प्रभाव ९०.४ टक्के आहे, तर मध्यम आणि तीव्र आजारापासून संरक्षण देण्यात ही लस १०० टक्के प्रभावी आहे. नोवोवॅक्सने सांगितले की, यूएस आणि मेक्सिकोमध्ये या लसीची चाचणी घेण्यात आली. कोरोनाच्या वेगवेगळ््या व्हेरिएंटसपासून ही लस सुरक्षा देते. प्राथमिक अहवालानुसार ही लस सुरक्षित आहे आणि जवळपास ९० टक्के प्रभावी आहे.

अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असल्याने तिथे लस तुटवडा जाणवत आहे. नोवोवॅक्स लसीची साठवण आणि वाहतूक करणे सोपे असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे विकसनशील देशांना लस पुरवठा करण्यात ही लस मोठे योगदान देण्याची शक्यता आहे. जगभरात ही लस खूप फायदेशीर ठरणार आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत यूएस, युरोप आणि जगभरातील इतर देशांकडून कंपनी आपल्या लसीसाठी परवानगी मागणार आहे. त्यानंतर महिन्याला या लसीचे १०० दशलक्ष डोस उत्पादिक केले जाणार आहेत. आपल्या लसीचे बहुतेक डोस मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जातील, असे नोवोवॅक्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह स्टॅनले इरेक यांनी सांगितले. दरम्यान भारत या वर्षाच्या अखेरपर्यंत या लसीचे २० कोटी डोस आणण्याच्या तयारीत आहे.

नोवोवॅक्स ९० टक्के प्रभावी
लस निर्मिती करणारी कंपनी नोवोवॅक्सने त्यांची लस कोरोनाच्या व्हेरिअंट विरोधात ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर संशोधन केल्यानंतर लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात ही उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांसाठीदेखील कोव्हॅक्सिनसोबतच नोवोवॅक्सही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सीरम मुलांवर घेणार पुढील महिन्यात चाचणी
सीरम इन्स्टिट्यूट ५५७ मुलांवर लसीची चाचणी घेण्याची योजना आखत आहे. जुलै महिन्यात सीरम संस्था मुलांवर ही चाचणी घेऊ शकते. अमेरिकन कंपनी नोवोवॅक्सने मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर करार केला होता. ज्या अंतर्गत २०० कोटी लस निर्मिती केली जाणार होती. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + 1 =