August 19, 2022

भारतात आढळला दुर्मिळ रक्तगट!

Read Time:4 Minute, 14 Second

ईएमएम निगेटिव्ह रक्तगट, देशातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती

नवी दिल्ली : साधारणपणे आपल्याला चार रक्तगट माहित असतात. यामध्ये ए, बी, ओ आणि एबी असे चार रक्तगट सर्वांनाच परिचयाचे आहेत. मात्र, भारतातील डॉक्टरांना एक दुर्मिळ रक्तगट आढळून आला आहे. हा रक्तगट असणारी व्यक्ती ही भारतातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती असल्याची बाब समोर आली आहे. ईएमएम निगेटिव्ह असा हा दुर्मिळ रक्तगट आहे. या व्यक्तींना रक्तदानही करता येत नाही किंवा दुस-याचे रक्तही घेता येत नाही.

गुजरातमध्ये ही दुर्मिळ रक्तगट असलेली व्यक्ती आढळली आहे. ही व्यक्ती ६५ वर्षांची असून, त्यांना हृदयविकाराचा आजार आहे. मुळातच मानवी शरीरात चार रक्तगट असतात. त्याशिवाय शरीरात ए, बी, ओ, आयएच आणि डफीसारखे ४२ प्रकार असतात. त्याशिवाय ३७५ अ‍ॅन्टीजेन असतात. यामध्ये ईएमएमचे प्रमाण अधिक असते. ईएमएम अ‍ॅन्टीजेन नैसर्गिकपणे शरीरात विकसित होतात. मात्र, पुरेशा प्रमाणात ईएमएम नसल्याने त्यांना ईएमएम निगेटीव्ह असे म्हटले जाते.

गुजरातमधील राजकोट येथे ६५ वर्षीय व्यक्तीत हा दुर्मिळ रक्तगट आढळला आहे. समर्पण रक्तदान केंद्रातील डॉक्टर सन्मुख जोशी यांनी सांगितले की, या ६५ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथे हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. या शस्त्रक्रियेसाठी त्यांना रक्ताची आवश्यकता होती. मात्र, अहमदाबाद येथील रक्तपेढीत त्यांच्या रक्तगटाची व्यक्ती उपलब्ध झाली नाही. त्यानंतर सुरत येथील रक्तपेढीत त्यांच्या रक्ताचे नमुने पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

ईएमएम निगेटिव्ह हा रक्तगट असलेली भारतातील ही एकमेव व्यक्ती ठरली आहे. या अगोदर विदेशात अशा ९ व्यक्ती आढळल्या आहेत. मात्र, भारतात हा दुर्मिळ रक्तगट असलेली एकमेव व्यक्ती आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुळातच अशा व्यक्तींना कोणाचे रक्तही घेता येत नाही आणि दुस-यांना रक्तदानही करता येत नाही. त्यामुळे त्यांची अडचण होणार आहे.

कोणत्याही रक्तगटाशी जुळले नाहीत नमुने
राजकोटमधील या ६५ वर्षीय व्यक्तीच्या रक्तगटाची चाचणी केल्यानंतर हे रक्त कोणत्याही रक्तगटाशी जुळले नाही. त्यानंतर या व्यक्तींच्या नातेवाईकांनी रक्ताचे नमुने तपासणीसाठी अमेरिकेत पाठवले. त्यावेळी त्यांचा रक्त गट दुर्मिळ असल्याची बाब समोर आली. भारतातील हा पहिलाच रक्तगट असून जगातील दहावी व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.

ना रक्तदान करता
येते ना रक्त घेता येते
जगातील फक्त १० जणांच्या शरीरात ईएमएमचे प्रमाण अधिक नसल्याचे समोर आले आहे. ईएमएमचे प्रमाण कमी असल्याने या इतरांपेक्षा वेगळ््या व्यक्ती आहेत. हा दुर्मिळ रक्तगट असल्याने या व्यक्ती इतरांना रक्तदान करू शकत नाहीत अथवा त्यांना इतर रक्तगटांच्या व्यक्ती रक्त देऊ शकत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × four =

Close