January 21, 2022

भारताचा भीमपराक्रम, १०० कोटी विक्रमी लसीकरण

Read Time:5 Minute, 53 Second

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईत आज भारताने महत्त्वाची कामगिरी नोंदविली असून, लसीकरण अभियानात तब्बल १०० कोटी लसीकरणाचा विक्रम नोंदविला आहे. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या २७९ दिवसांत भारताने ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. भारतात १० महिन्यांपूर्वी १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाला सुरुवात झाली होती. आज भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले आणि भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाची सुरुवात, लॉकडाऊन, मिशन बिगेन अगेन हे सर्व अनुभवल्यानंतर भारतीयांसह जगभरातील नागरिकांना कोरोनाच्या लसीची कमतरता भासत होती. मात्र, देशातील दोन कंपन्यांनी सुरुवातीच्या काळात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींची निर्मिती करून देशवासीयांना मोठा दिलासा दिला. त्यानंतर भारत सरकारने मोफत लसीकरणाची घोषणा करून लसीकरणाच्या कामाला गती दिली. त्यामुळे लस कधी येणार, येथून सुरू झालेला प्रवास आज १०० कोटी लसीकरणापर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत, १८ वर्षांवरील ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर ३१ टक्क्यांहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात १८ ते ४४ वयोगटातील ५५,२९,४४,०२१, ४५ ते ५९ वयोगटातील २६,८७,६५,११० आणि ६० वर्षांवरील १६,९८,२४,३०८ लोकांचे देशात लसीकरण करण्यात आले आहे.

राज्यांचा विचार करता सर्वाधिक लसीकरण उत्तर प्रदेशात झाले आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत १२,२१,६०,३३५ डोस दिले गेले आहेत, तर महाराष्ट्रात ९,३२,२५,५०६ डोस देण्यात आले आहेत. तिसरा नंबर पश्चिम बंगालचा आहे. बंगालमध्ये आतापर्यंत ६,८५,२८,९३६ डोस देण्यात आले आहेत, तर गुजरातमध्ये ६,७६,८७,९१३ डोस देण्यात आले आहेत. देशातील काही राज्यांमध्ये १०० टक्के नागरिकांना पहिला डोस देण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये सिक्कीम, गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, चंदीगढ, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली या राज्यांचा समावेश आहे. जानेवारी २०२० मध्ये भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. दरम्यान १६ जानेवारी २०२१ पासून देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली. त्यावेळई कोविड योद्धे असलेल्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचा-यांपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. १ मार्चपासून ६० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली, तर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले होते. अनंत अडचणींवर मात करत भारताने लसीकरणात १०० कोटींचा टप्पा ओलांडला.

भारताने रचला इतिहास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० कोटींच्या टप्प्याबद्दल बोलताना भारताने इतिहास रचला आहे. हा भारतीय विज्ञान, उद्योग, भारतीयांच्या सामूहिक भावनेचा विजय आहे, असे ते म्हणाले. २१ ऑक्टोबर २०२१ चा हा दिवस इतिहासात नोंदवला गेला आहे. भारताने काही वेळापूर्वीच १०० कोटींच्या लसीचा टप्पा पार केला आहे. १०० वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी देशाकडे १०० कोटींच्या लसीचे मजबूत सुरक्षा कवच आहे, असेही मोदी म्हणाले.

रॉय १०० कोटीव्या लसीचे मानकरी
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता देशाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरुवारी देशाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत १०० कोटींचा आकडा पार केला. ज्या व्यक्तीने १०० कोटीवी लस घेतली ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीची आहे. दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा १०० कोटीवा डोस देण्यात आला. हा डोस अरुण रॉय यांना देण्यात आला. अरुण रॉय वाराणसीचे रहिवासी असून ते दिव्यांग आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen − six =

Close