January 19, 2022

भाजपा आमदाराकडून महिला अधिका-यास शिवीगाळ

Read Time:3 Minute, 39 Second

पुणे : राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर आता पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेतील महिला अधिका-याला शिवीगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महिला अधिका-यासोबत संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार सुनील कांबळे यांनी ती जुनी असल्याची कबुलीच दिली आहे.

त्यामुळे आता सुनील कांबळे यांनी महिला अधिका-याला शिवीगाळ केल्याचे स्पष्ट होत आहे.
ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील एका महिला अधिका-यास कार्यकर्त्याच्या फोनवरून आमदार सुनील कांबळे यांनी फोन लावला होता. त्यावर संबंधित महिला अधिका-यांनी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे म्हटले होते. त्यावर कांबळे यांनी संबंधित महिला अधिका-यास घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. महिला अधिकारी आणि आमदार सुनील कांबळे यांच्यात जवळपास २ मिनिटांचे संभाषण झाले. त्यानंतर आता त्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाला असून त्यावर आमदार सुनील कांबळे यांनी ती क्लिप जुनी असल्याची प्रतिक्रिया दिली.

हा ऑडिओ जुना असल्याचे सांगत आमदार सुनील कांबळे यांनी अन्य कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र ही ऑडिओ क्लिप जुनी असल्याचे म्हणत सुनील कांबळे यांनी एक प्रकारे कबुलीच दिली आहे.
पुणे महापालिकेत सुनील कांबळे हे चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. तर त्यांचे बंधू दिलीप कांबळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्य मंत्री राहिले आहेत.

आमदारकीचा माज घरी ठेवावा : रुपाली चाकणकर
‘‘पुणे महापालिकेतील महिला पदाधिका-यासोबत जी भाषा भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी वापरली आहे. त्या विधानांचा आम्ही निषेध व्यक्त करतो, आम्ही सर्व संबंधित महिलेच्या पाठीशी आहोत. तसेच भाजपा आमदार सुनील कांबळे, आपण महापालिकेत सत्तेत असून आमदार आहात, त्यामुळे याचा माज घरी दाखवावा, पालिकेतील महिला कर्मचा-यांवर नाही,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 4 =

Close