भाजपचा चौकार

Read Time:6 Minute, 20 Second

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत उत्तर प्रदेशासह उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात एकहाती सत्ता मिळवित चौकार लगावला, तर पंजाबमध्ये आपच्या झाडूने सत्ताधारी कॉंग्रेससह अकाली दल, माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या आघाडीचा सुपडा साफ करीत ११७ पैकी तब्बल ९२ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली. आपच्या झाडूच्या तडाख्यात माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, प्रकाशसिंग बादल यासारख्या दिग्गजांना धूळ चारली, तर उत्तर प्रदेशात सलग दुस-यांदा बहुमताचा आकडा पार करीत भाजपने मागील ३७ वर्षांच्या इतिहासात सलग दुस-यांदा सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले. सपा नेते अखिलेश यादव यांनी भाजपशी टक्कर दिली. परंतु त्यांना याचे रुपांतर सत्तेत करता आले नाही. उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातही भाजपने सलग दुस-यांदा सत्ता काबिज केली. मिनी लोकसभा म्हणून ओळखल्या जाणा-या या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्याने विरोधकांसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप, सपा, कॉंग्रेस, बसपा यांच्यात लढत रंगली. मात्र, या निवडणुकीत खरी लढत भाजप आणि सपातच पाहायला मिळाली. सुरुवातीला दोन्ही पक्षांत चुरस पाहायला मिळाली. मात्र, भाजपने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारत ४०३ पैकी तब्बल २७३ जागांवर विजय मिळविला, तर सपाला केवळ १२५ जागांवरच समाधान मानावे लागले. सपा नेते अखिलेश यादव यांनी या निवडणुकीत जातीय समीकरणाची रणनिती आखून जोरदार तयारी केली होती. मात्र, त्यांची ही योजना सत्तेचा सोपान गाठण्यात यशस्वी ठरली नाही. परंतु २०१७ च्या तुलनेत यावेळी सपाला मोठी झेप घेता आली. मागच्या वेळी सपाला केवळ ४४ जागांवरच समाधान मानावे लागले होते. यावेळी त्यांना ७३ जागांचा फायदा झाला, तर भाजपला ४३ जागा गमवाव्या लागल्या. येथे कॉंग्रेस आणि बसपाला जबर धक्का बसला. कॉंग्रेसला केवळ २ तर बसपाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे भाजपात बंडखोरी करणा-या स्वामीप्रसाद मौर्य, दारासिंह चौहान यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांना पराभवाचा धक्का बसला, तर नोएडात भाजपच्या विक्रम सिंह यांनी १ लाख ७९ हजार एवढ्या विक्रमी मतांनी विजय मिळविला.

भाजपने केवळ उत्तर प्रदेशातच मुसंडी मारली नाही, तर उत्तराखंड, मणिपूर, गोव्यातही स्पष्ट बहुमत मिळवित सलग दुस-यांदा सत्ता काबिज केली. उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप-कॉंग्रेसमध्ये थेट लढत झाली. येथे काट्याची टक्कर असल्याचा अंदाज बांधला जात होता. सुरुवातीला तसेच चित्र होते. मात्र, दुपारनंतर भाजपने मुसंडी मारत ७० पैकी ४८ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली. त्यामुळे कॉंग्रेसला केवळ १८ जागांवरच समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे येथे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जाणारे कॉंग्रेसचे हरिश रावत यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री (भाजप) पुष्करसिंह धामी आणि आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अजय कोठियाल यांना पराभवाचा धक्का बसला. भाजपने येथे जोरदार मुसंडी मारली.

गोवा आणि मणिपूरमध्येही कॉंग्रेस आणि भाजपमध्ये चुरस राहील, असाही अंदाज वर्तवला होता. मात्र, या दोन्ही राज्यांत भाजपने एकहाती विजय मिळविला. मणिपूरमध्ये ६० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने तब्बल ३१ जागांवर विजय सत्ता काबिज केली. येथे कॉंग्रेसला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. येथे कॉंग्रेसचे २३ जागांचे नुकसान झाले. त्यामुळे येथे सत्ता स्थापनेचा कॉंग्रेसचा मनसुबा उधळला गेला.

आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत इतिहास घडवला. अरंिवद्र केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने राज्यात विरोधी पक्ष नाम मात्र ठेवला आहे. भाजपने भलेही काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा दिली असली तरी प्रत्यक्षात ते काम केजरीवाल यांचा पक्ष करताना दिसत आहे. आप ने आधी काँग्रेसकडून दिल्ली काढून घेतले आणि आता पंजाब देखील ताब्यात घेतले. आप चा हा विजयी रथ आता या दोन राज्यापुरता मर्यादीत राहणार नाही. पंजाबमधील विजयानंतर केजरीवाल यांनी भविष्यातील योजनेकडे इशारा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 + one =