भरदिवसा महाराष्ट्र बँकेवर सशस्त्र दरोडा

Read Time:2 Minute, 29 Second

जांबुत : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर दुपारच्या सुमारास दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दुपारी १.३० च्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळीने रिव्हॉल्व्हर लावून २ कोटी रुपयांचे सोने आणि ३१ लाख रुपये रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.

ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली असून त्याचा व्हीडीओ आता समोर आला आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की, शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे पिंपरखेड (ता. शिरूर, जि. पुणे) या गावामधील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत  दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी बँक अधिकारी व कर्मचा-यांना पिस्तूलचा धाक दाखवून बँकेतील ३० ते ३५ लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. सदरचे चोरटे हे सिल्व्हर कलरच्या सियाज कारमधून जांबुत (ता. शिरूर, जि. पुणे) या गावाकडे वेगात पळून गेले. पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहेत.

चोरट्यांच्या गाडीवर ‘प्रेस’ लिहिलेले असून गाडीमध्ये पाच ते सहा इसम असून ते पंचवीस ते तीस वयोगटातील आहेत.  तसेच त्यांनी निळ्या जीन्स पँट व तपकिरी आणि ग्रे कलरची जर्किन घातलेले असून कानटोप्या घातलेल्या आहेत. पायामध्ये बूट आहेत तसेच त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहेत अशी माहिती मिळत असून पोलिसांनी संबंधित गावाच्या आसपासच्या हद्दीत नाकाबंदी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × four =