August 19, 2022

बेपत्ता व्यक्तीचा जलकुंभात आढळला मृतदेह

Read Time:2 Minute, 49 Second

परभणी/प्रतिनिधी

शहरातील अमेयनगर येथील जलकुंभात एका ४४ वर्षीय इसमाचा मृतदेह गुरूवार, दि.१२ मे रोजी दुपारी ०१ वाजताच्या सुमारास आढळून आला. नानलपेठ पोलिस, मनपा प्रशासनाने मृतदेह बाहेर काढला असून मयताची ओळख पटविण्यात यश आले आहे.

अमेयनगर येथील जलकुंभातील पाण्याचा स्तर तपासण्यासाठी असलेल्या यंत्रणेत बिघाड झाल्याने कर्मचारी संबंधीत यंत्रणा दुरूस्त करण्यासाठी जलकुंभावर चढले होते. यावेळी त्यांना जलकुंभामध्ये एक मृतदेह आढळून आला. कर्मचा-यांनी याची माहिती वरीष्ठ अधिका-यांना दिली. महापालिका अभियंता मिर्झा तन्वीर बेग, सोहेल सिद्दिकी, प्रविण हटकर, हेमंत दापकेकर, नानलपेठचे पोउपनि. लक्ष्मण मुरकुटे, पोउपनि.म्हात्रे, कर्मचारी मनोज राठोड, टाकरस, दिनकर चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमनचे दिपक कानोडे, गौरव देशमुख यांच्या पथकाने मृतदेह जलकुंभाबाहेर काढला.

यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या भागातून जात असलेल्या एका महिलेने मयत हा आपला भाऊ असल्याचे सांगितले. मयताचे नाव शेख अय्युब शेख अहेमद असे आहे. हा इसम परभणी येथे एका कार्यक्रमासाठी आला होता. १९ एप्रिलपासून सदर इसम बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला जात होता. या इसमाचा मृतदेह जलकुंभात आढळून आला. जलकुंभाच्या गेटवर लॉक लावलेले असताना हास इसम जलकुंभावर चढला कसा हे मात्र समजू शकले नाही. घटनेचा अधिक तपास नानलपेठ पोलीस करीत आहेत.

जलकुंभाची सुरक्षा वा-यावर
शहरातील अमेयनगर येथील जलकुंभात मृतदेह आढळून आल्यानंतर नागरीकांत उलट सुलट चर्चा होताना दिसून येत आहे. जलकुंभाला गेट असताना सुरक्षा असताना संबंधीत मृत व्यक्ती पाण्याच्या टाकीवर कसा गेला याबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या घटनेमुळे शहरातील पाण्याच्या टाकीची सुरक्षा देखील वा-यावर असल्याची चर्चा नागरीकातून होताना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 × four =

Close