July 1, 2022

बिहार, यूपीत जाळपोळ, तोडफोड, तेलंगणातही रेल्वे जाळली

Read Time:3 Minute, 35 Second

पाटणा : अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात सलग तिस-या दिवशी आंदोलक रस्त्यावर उतरले असून अनेक ठिकाणी ट्रेनला आग लावण्यात आली. बिहारमधील बेगुसराय रेल्वेला आग लावल्याने संपूर्ण डबे जळून खाक झाले. याचा वणवा थेट सिकंदराबादपर्यंत पोहोचला असून, तेथेही संतप्त आंदोलकांनी रेल्वे जाळली.

‘अग्निपथ’ योजनेंतर्गत ४ वर्षांसाठी ‘अग्निवीरां’ची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली होती. त्यानंतर बिहारमध्ये या योजनेच्या निषेधाचा सूर उमटला. त्याचे लोण गुरुवारी उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश, तेलंगणापर्यंत पोहोचले. उत्तर प्रदेशातील बलियामध्ये जमावाने ट्रेनला आग लावलीे. आंदोलकांनी स्थानकावर उभ्या ट्रेनवर हल्ला करत तोडफोड केली. उत्तर प्रदेशातील पूर्व भागात तरुण रस्त्यावर उतरले. त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. बलियामध्येही आंदोलक आक्रमक झाले होते.

बिहारमध्येही आज जाळपोळ, तोडफोड झाली. राज्यातील मोहीउद्दीनगर स्थानकावर उभ्या जम्मू-तावी एक्स्प्रेसच्या २ डब्यांना आग लावण्यात आली. तसेच बेगुसराय येथेही रेल्वे जाळण्यात आली. आरा रेल्वे स्थानकावर रेल्वे इंजिनला आग लावली. बहुतांश जिल्ह्यांत तरुणांनी रेल्वेमार्ग आणि रस्त्यांवर जाळपोळ केली. तसेच भाजप आमदाराच्या वाहनावरही दगडफेक केली. छाप्रा, भबुआ रेल्वे स्थानकांतही आंदोलकांनी मोडतोड केली. याशिवाय हरियाणा आणि मध्य प्रदेशासह दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, तेलंगणातही आंदोलन पेटले.

केंद्राची माघार, सैन्यभरतीच्या वयोमर्यादेत केला बदल
‘अग्निपथ’ योजनेवरून तरुणांचा रोष आणि विरोधकांच्या टीकेला सामोरे जाणा-या केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतले. या योजनेंतर्गत सैन्यभरतीसाठी वयोमर्यादा २१ वरून २३ करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. या योजनेमुळे संरक्षण दलाला नवे सामर्थ्य मिळेल, असा दावा करत सरकारने योजनेचे फायदे अधोरेखित केले. चार वर्षांच्या सेवेनंतर ‘अग्निवीरां’ना ११.७१ लाखांचा सेवानिधी, बँक कर्ज योजनेचा लाभ, बारावीच्या समकक्ष प्रमाणपत्र मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × three =

Close