January 19, 2022

बिल भरा अन्यथा वीज पुरवठा खंडीत होणार

Read Time:2 Minute, 26 Second

झरी : विज बिल थकबाकी असलेल्या शेतक-यांनी आपल्याकडील थकीत वीजबिल त्वरित भरावे अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरण दिला आहे. ऐन रब्बी हंगामात महावितरणने वीज कापण्याचा इशारा दिल्यामुळे शेतक-यांमध्ये महावितरण विरोधात पचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान शेतक-यांनी बिल भरण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली आहे.

झरी परिसरात मागील दोन दिवसांपासून थकित वीज बिल असलेल्या शेतक-यांचा वीज पुरवठा खंडित करण्यास महावितरणने प्रारंभ केला होता. या मोहिमेमुळे अगोदरच अतिवृष्टीमुळे हैराण असलेल्या शेतक-यांनी वीज पुरवठा खंडीत करण्याच्या विरोधात संताप व्यक्त केला. त्यानंतर वीज वितरण कंपनीने काही ठिकाणी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला आहे. दरम्यान थकीत वीज बिल भरण्यासाठी महावितरणने आणखी आठ- दहा दिवसांची सवलत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. दिलेल्या अल्टिमेटमध्ये शेतक-यांनी वीज बिल भरणा नाही केल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

झरी परिसरात सध्या कपाशीसह सर्व पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे शेतीसाठी वीज पुरवठ्याची नितांत आवश्यकता आहे. शेतक-यांना वीज बिल माफ केले जाईल अशी आशा होती. त्यामुळे परिसरातील अनेक शेतक-यांकडे मोठ्या प्रमाणात वीज बिल भरणा बाकी आहे. वेळोवेळी सूचना देऊनही शेतक-यांनी वीज बिल न भरल्यामुळे अखेर महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याचे हत्यार उपसले आहे. ऐन रब्बी हंगामात शेतक-यांची मुस्कटदाबी करणा-या महावितरण विरोधात शेतक-यातून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × one =

Close