बिल्डर संजय बियाणी हत्या प्रकरणी नांदेड पोलीस सपशेल अपयशी | तपास CBI कडे देण्याची खा.चिखलीकरांची मागणी

Read Time:5 Minute, 3 Second

शहरात घडलेल्या प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येला आज 12 दिवस लोटले आहेत. पण अद्यापही पोलिसांच्या हाती काही ठोस धागेदोरे सापडले नसून खुनाचे मारेकरी मोकाटच आहेत.याबद्दल नांदेड पोलीसांशी माझे काही वैर नाही मात्र या प्रकरणी स्थापन करण्यात आलेली ‘एसआयटी’ या खून प्रकरणाचा तपास लावू शकत नाही.नांदेड पोलीस या प्रकरणात सपशेल अपयशी ठरले आहेत म्हणून हा गुन्हा केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)कडे द्यावा अशी मागणी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.

खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील निवासस्थानी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, प्रविण साले, दिलीप कंदकुर्ते, प्रविण पाटील चिखलीकर संजय बियाणी यांचे जावई मयुर मंत्री, माणिकराव मुकदम, माधवराव उच्चेकर, किशोर देशमुख, कोलंबीचे सरपंच प्रल्हाद बैस यांची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

दि.5 एप्रिल रोजी संजय बियाणींची दिवसाढवळ्या गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला आज 12 दिवस झाले आहेत. मात्र तरीही या हत्येबाबत पोलिसांना महत्वाचे धागेदोरे सापडलेले नाहीत अद्यापही हत्येचे गूढ कायम आहे. या हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. यातील अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे मात्र वेळ लागेल असे उत्तर मिळत असल्याने स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीकडून या गुन्ह्याचा तपास लागणे शक्य नाही. नांदेड पोलीस सपशेल अपयशी ठरले आहे म्हणून हा गुन्हा केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा असे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यात दुसरा संजय बियाणी होवू नये, संजय बियाणी हे सामाजिक दायित्व जपणारे व्यक्ती होते. जवळपास 400 ते 500 कुटूंबियांचे ते पालक होते. त्यामुळे या घटनेचा तपास लागला नाही तर नांदेडमध्ये भीतीने कोणी नवीन उद्योजक येणार नाहीत. मी या संदर्भाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांनी तपास करण्याबद्दल मला ग्वाही दिली आहे. या गुन्ह्यात प्रताप पाटील चिखलीकर असो की अन्य कोणाचे नाव असेल तरीही या गुन्ह्याची उकल व्हावी, अशीच आपली व बियाणी कुटुंबियांची इच्छा आहे. ‘एसआयटी’ केवळ रिंदाच्या नावावर गोल-गोल फिरत आहे. मुळात तो या घटनेचा गुन्हेगार आहे की, नाही याचा तपास लागत नाही. माझा पोलीसांवर आरोप नाही पण संजय बियाणीचे मारेकरी पोलीसांनी पकडले पाहिजेत व बियाणी कुटुंबाना न्याय मिळाला पाहिजे अशीच माझी इच्छा असल्याचं खा. प्रताप पाटील चिखलीकर बोलताना म्हणाले.

तुमच्या मते बियाणी हत्येचा तपास किती दिवसात लागेल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता खा. चिखलीकर यांनी आता वेळ निघून गेली आहे, असे उत्तर दिले. त्यामुळे येत्या दि. 20 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.या आंदोलनात संजय बियाणी यांच्या बद्दल प्रेम असणारे आणि या हत्याप्रकरणाला विरोध असणारा प्रत्येक व्यक्ती या धरणे आंदोलनात सामील होवू शकतो. त्या सर्वांनी दि.20 एप्रिल रोजी  धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 − 6 =