बाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले ‘थापा’ आहेत तरी कोण?, जाणून घ्या…

Read Time:5 Minute, 7 Second


मुंबई | एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत ऐतिहासिक बंड केलं आणि एक एक करत आमदार, खासदार, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा मोठा गट शिंदेंना सामील झाला. कधीकाळी शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारेही शिंदेंच्या गटात गेले.
एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणारे अनेक आमदार व नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. या बंडानंतरही शिवसेना भक्कम असल्याचं म्हणत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले. पण या सगळ्यात शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा बाळासाहेबांच्या सावलीनेच शिवसेनेची साथ सोडली.

बाळासाहेबांचे निकटवर्तीय आणि त्यांची सावली म्हणून ओळखले जाणारे चंपासिंह थापाही शिवसेनेकडे पाठ फिरवत शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहायक म्हणून ओळखले जाणारे थापा पुन्हा एकदा चर्चेत आले.

चंपासिंह थापा साधारण 40 वर्षांपूर्वी नेपाळमधून भारतात आले. गोरेगावात लहान-मोठी कामं करत असताना थापा भांडूपचे नगरसेवक के.टी. थापा यांच्या ओळखीने एकदा मातोश्रीवर गेले. के.टी. थापांच्या ओळखीने चंपासिंह थापांनी मातोश्रीवर प्रवेश मिळवला आणि नंतर स्वतःचं आयुष्यच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना अर्पण करून टाकलं. बाळासाहेब ठाकरेंचा दिनक्रम सांभाळणं, त्यांना नॅपकीन देणं, पाणी देणं आणि त्यांची सेवा करणं ही कामं थापा खूप मनापासून करत होते. बाळासाहेबांच्या जेवणाची, औषधाच्या वेळांची आणि दिनक्रमातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची काळजी घेत थापा हे मातोश्रीतीचाच एक भाग बनले.

मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीशेजारीच थापांची एक छोटीशी खोली होती. थापांचं कुटुंब नेपाळमध्ये असलं तरी ते बाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिले. नेपाळमध्ये शिवसेनेची उभारणी करण्यातही थापांचं मोठं योगदानय.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही थापा चर्चेत आले होते. थापा बाळासाहेबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबतच होते. असंही म्हणतात की बाळासाहेबांनी त्यांच्या निधनाआधी शेवटचा संवादही थापा याच्यांशीच केला होता.

दसरा मेळाव्यासह अनेक जाहीर सभांमध्ये थापा बाळासाहेबांच्या आसनामागे नम्रतेने उभे असल्याचंही अनेक कॅमेऱ्यांनी टिपलं. पण एवढी वर्ष बाळासाहेबांसोबत काम केल्यानंतर थापा यांनी उद्धव ठाकरेंसोबत न राहता एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा मोठा निर्णय घेतला. थापांचा एकंदर प्रवास बघून ते शिवसेनेत घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या घडामोडींचे साक्षीदार आहेत, असं म्हणायला काही हरकत नाही. पण त्यांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने स्वाभाविकच उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

चर्चा म्हणून नाही पण याचा फटकाही उद्धव ठाकरेंना बसू शकतो. उद्धव ठाकरेंचं शिवसेनेवरच वर्चस्व कमी होत चाललंय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. थापांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताकदीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतायत.

थोडक्यात बातम्या- 

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूंवर कोसळला दुःखाचा डोंगर | Mahesh Babu Mother

भाजपमध्ये खळबळ; पंकजा मुंडेंनी थेट मोदींना दिलं आव्हान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × one =