July 1, 2022

बाल शौर्य पुरस्कार प्राप्त एजाजच्या नशिबी बुरे दिन!!!

Read Time:4 Minute, 38 Second

अर्धापूर : राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान होऊन देशात नांदेडचे नाव करणा-या अर्धापूर तालुक्यतील पार्डी येथील बाल शौर्य पुरस्कार प्राप्त एजाजच्या नशिबी आता बुरे दिन आले आहेत.आर्थिक संकटामुळे एजाजला चक्क केळीच्या गाडीवर मजुर म्हणून काम करावी लागत आहे.मात्र गांधारीचे रूप धारण केलेल्या प्रशासकीय यंत्रनेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.यामुळे गावक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.

अतुलनीय शौर्य दाखवत नांदेड जिल्ह्यातील अधार्पूर तालुक्यातील पार्डी येथे २०१८ मध्ये एजाज नदाफ या शाळकरी विद्यार्थ्याने नदीच्या वाहत्या प्रवाहात वाहून जाणा-या दोन मुलींचा जीव वाचवला होता.या शौर्याबद्दल एजाजला राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यावेळी एजाज हा केवळ पंधरा वर्षाचा होता, तो पार्डी येथील रहिवासी असून सध्या त्याला पोटाची खळगी भरण्यासाठी केळीच्या गाडीवर मजुरी करावी लागते आहे. एजाज मोलमजुरी करुन दिवसाला केवळ ३०० रुपये कमवतो आहे. अत्यंत गरीब परिवारात जन्मलेल्या एजाज नदफचे आई-वडील शेतात मजुरी करतात.

पण त्याच्याकडे बारावीच्या परीक्षेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे त्याचे एक वर्ष वाया गेले. यंदा बारावीत एजाजला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. पण पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकारने मदत करण्याची गरज असल्याचे त्याची आई सांगत आहे. जिल्हा परिषदेने यापूर्वी एजाज नदाफला घरकुल मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते.

पण आतापर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ त्याला मिळालेला नाही. तसेच नोकरीही देण्याचे आश्वासनही त्याला देण्यात आले होते. सध्या एजाज आणि त्याचे कुटुंब परिस्थितीशी संघर्ष करत अच्छे दिन येण्याची वाट पाहत आहेत. एजाजकडे राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचे प्रमाणपत्र ठेवण्यासाठी साधे कपाटही नाही.

सध्या रेल्वेचे राज्यमंत्रीपद महाराष्ट्राकडे आहे. त्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यात लक्ष घालून एजाजला रेल्वेमध्ये नोकरी दिली तर बरे होईल, अशी विनंती एजाजला मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते नागोराव भांगे यांनी केली आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून दोघांचे प्राण वाचवणा-या एजाजला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळाला. पण त्यानंतर एजाजला काहीही मिळालेले नाही, त्याच्यावर शिक्षण सोडून मजुरी करण्याची वेळ आली आहे.

अनेक वेळा घरकुल व शिक्षणासाठी मदत मिळावी असा पाठपुरावा प्रशासनाकडे करण्यात आला मात्र याकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.यामुळे आर्थिक संकटामुळे एजाजला चक्क केळीच्या गाडीवर मजुर म्हणून काम करावी लागत आहे.दरम्यान जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एजाजचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्याला घरकुल मंजूर करावे अशी मागणी करण्यात आली होती.परंतू हा विषयही लालफितील अडकुन पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen − 12 =

Close