
फडणवीसांकडे अर्थ, गृह खाते?
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे-फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार, याची चर्चा रंगली आहे.
फडणवीसांच्या मर्जीतील कोणाकोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, तर शिंदे गटातील कुठल्या बंडखोराला लॉटरी लागणार, याची उत्सुकता आहे. कॅबिनेटमधील दमदार खाती आपल्याकडे ठेवण्याची रणनीती भाजप आखेल, अशी अटकळ आधीपासूनच बांधली जात होती. त्यानुसार अर्थ आणि गृह ही क्रिमी खाती भाजप स्वत:कडेच ठेवेल, असे बोलले जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:च अर्थ आणि गृह मंत्रालय सांभाळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात मुख्यमंत्रिपदी असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी गृह खाते स्वत:कडेच ठेवले होते. त्यामुळे यावेळीही फडणवीस गृह खाते स्वत:कडेच ठेवण्याची शक्यता आहे. त्यासोबतच अर्थ मंत्रालयाची धुराही तेच खांद्यावर घेण्याचे संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही दोन्ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे होती. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थ खाते अशी जबाबदारी घेतली होती, तर राष्ट्रवादीच्याच अनिल देशमुख यांच्याकडे गृह खात्याची नाडी होती. मात्र फडणवीस आता अर्थ आणि गृह अशी दुहेरी आणि तितकीच महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची चिन्हे आहेत.