प्रथम वर्ष प्रवेशासाठी एक सामायिक परीक्षा!

Read Time:4 Minute, 0 Second

नागपूर : कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी राज्यातील १३ ही विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती स्थापन करून राज्य स्तरावर एकच ‘सामायिक परीक्षा’ (सीईटी) घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

नागपूर येथे युवा सेनेच्या कार्यक्रमाला सामंत आले होते, त्यावेळी ते बोलत होते. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली. मात्र, बारावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षण विभागाने अद्याप कुठलाही मार्ग सुचवलेला नाही. शिवाय पदवी प्रथम वर्षांला अनेक अभ्यासक्रम असल्याने प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रवेशपूर्व परीक्षा (सामायिक परीक्षा) घेणे शक्य नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे होणार, असा प्रश्न महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

कोरोनामुळे प्रथम सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यापूर्वी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले. आता केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणेच राज्यातही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रथम वर्षाचे प्रवेश कसे होणार, याची चिंता विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. त्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, राज्यातील खासगी विद्यापीठांच्या ‘पेरा इंडिया’ (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या संघटनेच्या माध्यमातून खासगी विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पेरा सीईटी २०२१ यंदा १६ ते १८ जुलैदरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी १० जुलै ही अंतिम मुदत असून, २३ जुलैला निकाल जाहीर करण्यात येणार आहे, असेही सामंत म्हणाले.

घरबसल्या देता येणार पेरा सीईटी
व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राज्य शासनाकडून सीईटी घेतली जाते. तसेच पेरा सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना राज्यातील १३ खासगी विद्यापीठांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येतो. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना घरबसल्या पेरा सीईटी देता येईल, असेही उदय सामंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × 1 =