प्रचार सभांना परवानगी; माळेगाव यात्रेलाच का नाही

Read Time:2 Minute, 45 Second

नांदेड: प्रतिनिधी

शहरासह ग्रामीण भागातही प्रचार सभा घेतल्या जात आहेत. मेळावे भरविले जात आहेत. हजारोंचे मोर्चे काढले जात आहेत. असे असतांना माळेगाव यात्रेलाच परवानगी का नाही? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा जि.प सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांनी उपस्थित केला आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत माळेगाव यात्रेवरून जोरदार चर्चा झाली. जिल्हा परिषद प्रशासन पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचा आरोप प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केला आहे. कोरोना महामारीविरुद्धच्या नियमांचे पालन करीत पालखी महोत्सव, देवस्वारी होणार आहे. या यात्रेसाठी जिल्हा परिषदेचा जमा असलेला शेष निधी खर्च करावा, अशी मागणीही प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केली आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या लाटेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड जनजागृती झालेली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक कोविड-१९ ची नियमावली पाळत आहेत.

अशा परिस्थितीत माळेगावची यात्रा नाकारणे म्हणजे भाविक-भक्तांच्या भावनांचा चुराडा होय आणि हा चुराडा सत्ताधारी आणि जिल्हा परिषद प्रशासन संयुक्तरित्या करीत असल्याचा घणाघाती आरोप चिखलीकर यांनी केला आहे. माळेगावच्या यात्रेनिमित्त कोरोना आणि ओमिक्रॉनचे सर्व नियम पाळून पालखी महोत्सव, देवस्वारीला परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची भेट घेतली आहे. नियमांचे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले असल्याचे सांगण्यात आले. माळेगाव यात्रेसंदर्भात प्रवीण पाटील चिखलीकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी आणि प्रशासकीय यंत्रणेची चांगली कोंडी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

six + twenty =