पोल्ट्री व्यवसायातुन लाखोंचे उत्पन्न; राणी अंकुलगा येथील गणेश गुराळे यांची यशोगाथा

Read Time:3 Minute, 56 Second

राणी अंकुलगा : पारंपारिक पिकांसह आधुनिक तंत्रयुगात शेतीपुरक व्यवसाय शेतकऱ्यासाठी वरदान ठरत असून राणी अंकुलगा येथील गणेश गुराळे या युवा शेतकऱ्याने पोल्ट्री व्यवसायातून आर्थिक ” श्रीगणेशा ” करत वर्षात सहा लाखाचा नफा मिळविला असून तरूणांच्या हाताला काम व शेतीला सेंद्रीय खत असा दुहेरी लाभ मिळवित आर्थिक उन्नती साधली आहे.

निसर्गाचा बिघडलेला समतोल, शेतीमाल किमतीतील अनियमितता, शासनाचे चुकीचे धोरणे हे सगळी कारणे शेतीत तोट्याचे गणित दाखवित असून शेती परवडत नसल्याचे दिसते, परंतु या सर्व अडचणीचा सामना करत जिद्द, कष्ट व प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर शेतीपुरक व्यवसायातून फायद्याची शेती होऊ शकते हे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथील प्रयोगशील युवा शेतकरी गणेश माधवराव गुराळे यांनी सिद्ध करून दाखविले असून त्यांची ही यशोगाथा तरूणासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

आधुनिकतेची कास धरून मन लावून काम केल्यास शेतीपुरक व्यवसायात ही हमखास यश संपादन करता येते. त्यासाठी आपल्यात इच्छा शक्ती असणे आवश्यक असल्याचे राणी अंकुलगा गावातील गणेश माधवराव गुराळे या युवा शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.घरी नऊ एकर शेती त्यात वडीलांच्या अकाली निधनानंतर अपघाताने शेतीकडे वळताना हंगामी व ऊस पिकांतून सुरूवात केली. त्यानंतर शेती पुरक पोल्ट्री व्यवसायाची निवड केली.शेड व इतर असे एकूण १९ लाख रुपयांची गुंतवणुक केली.त्यात योग्य नियोजन व उत्तम दर्जाचे कोंबडी पोसल्याने फक्त एका वर्षात तीन फेऱ्यात २५ लाखाचा माल विकला गेला.तर यातून ६ लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.

गणेश गुराळे यांनी शेती पुरक पोल्ट्री व्यवसायातून आर्थिक गणित जुळविताना लांब बाजारपेठाला जाणे टाळून किनगाव, निलंगा, नळेगाव, लातूर, उदगीर,रेणापुर येथील व्यापाऱ्यांना जाग्यावरून विक्री केले. त्यामुळे त्यांचा वाहतुकीचा खर्च ही वाचला.व त्यासोबत त्यांना उत्कृष्ट खत मिळाल्याने शेतीची पोत ही सुधारली असल्याने पोल्ट्री व्यवसाय गणेश यांच्यासाठी वरदान ठरला आहे.

तरूणांनी शेती पुरक व्यवसायाकडे वळावे.
मोठे स्वप्न न पाहता उपलब्ध साधन सामुग्रीच्या साह्याने जिद्द,चिकाटी व उत्तम नियोजन असले तर छोट्याशा गुंतवणुकीतून शेती व्यवसाय व त्याला पूरक पोल्ट्री सारखे व्यवसाय केले तर त्यातून फार मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती पुरक व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे.
-गणेश गुराळे
युवा शेतकरी राणी अंकुलगा.

Leave a Reply

Your email address will not be published.

three + sixteen =