पोलिस सुस्त; लुटारू मस्त!

Read Time:3 Minute, 55 Second

नांदेड : विशेष प्र्रतिनिधी
शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना त्याचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. गावाला जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यास लिफ्ट देऊन मदत करु पाहणा-यांनीच त्याला लुटले. ही घटना रविवारी (दि.८) पहाटे ४.३०च्या सुमारास पाटनूरकरनगर भागात घडली. दरम्यान विद्यार्थ्याने धाडस दाखवत नागरिकांच्याच मदतीने दोन लुटारुंनाच पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली परंतु नेहमीप्रमाणे पोलीस उशिरा दाखल झाले. त्यामुळे पोलीस सुस्त तर लुटारू मस्त अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था पुर्णत: कोलमडली असताना पोलीस सतर्क होतील असा अंदाज होता परंतु तो चुकीचा ठरत असणारी घटना रविवारी पहाटे घडली. शहरातील खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा गडचिरोली येथील निदेश महादेव दुर्गे हा तरुण दि. ८ रोजी पहाटे गावाकडे जाण्यास निघाला होता. रेल्वेने जाण्यासाठी तो अशोकनगर-भाग्यनगर मुख्य रस्त्यावर ऑटोरिक्षाची वाट पाहत थांबला होता. थोड्याच वेळात एका दुचाकीवर तिघेजण तेथे आले. त्यांनी त्याला कोठे जायचे, असे विचारून आम्ही तुला सोडतो, असे सांगितले. त्यासाठी १०० रुपये घेतो, असेही ते म्हणाले. दुर्गेने त्यास होकार दिला. दुचाकीवर बसवून रस्त्याशेजारीच कैलास नगरमध्ये नेऊन त्यांनी दुर्गे यास जबर मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व १ हजार ७०० रु. काढून घेतले. तिघांपैकी कमी वयस्कर असलेल्याला दुर्गे याने पकडून ठेवले व आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारील नागरिक तत्काळ धावले. त्यांनी दुर्गे यास मदत करून लुटारूंना पकडून ठेवले.

हा प्रकार भाग्यनगर पोलिसांना कळवण्यात आला परंतु साखर झोपेचे सोंग घेणारे पोलीस तब्बल एक तास घटनास्थळी पोहचलेच नाहीत. अनेक वेळा फोन व नंतर पोलीस नियंत्रण कक्षाला दोन वेळा फोन केल्यानंतर स्कुटीवर महिला व एक पुरुष पोलीस आला. त्यांनी लुटारूस पाहिले त्यांनीही गाडीची वाट पाहिली. शेवटी दुर्गेनेच मी स्कुटी चालवतो लुटारूला घेऊन बसा, असे सांगुन ठाण्यात नेले.

या प्रकरणी भाग्यनगर ठाण्यात सुमित माधव एडके व दिपक नरेश नारागुंडे यांना ताब्यात घेत दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तपास सपोनि वाठोरे या करीत आहेत. तरुणाने लुटणा-यास पकडून ठेवले परंतु भाग्यनगर पोलीस एक तासापर्यंत घटनास्थळी गेलीच नाही. यामुळे नांदेड पोलिसांच्या अकार्यक्षमतेची चर्चा शहरात दिवसभर होत होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

seven − four =