May 19, 2022

पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही- पोलिस अधीक्षक शेवाळे

Read Time:4 Minute, 20 Second

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी ता. 25 मार्च ते ता. 4 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लावली आहे. सदर लॉकडाउन कालावधीत नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण धार्मिकस्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट, प्रार्थनास्थळे इत्यादी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हल्लाबोल मिरवणुकीच्या दरम्यान काही तरुणांनी गोंधळ घालत पोलिसावर हल्ला केला.

या हल्ल्यातील हल्लेखोरांना कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घालणार नाही व कोणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

ता. 29 मार्च रोजी होळी सणानिमित्त शीख समाजाच्या वतीने दरवर्षी हल्लाबोल काढण्यात येतो. सदर हल्लाबोल कार्यक्रमाच्या अनुषंगाने परवानगीसाठी गुरुद्वारा प्रशासनाने परवानगी मागितली होती. परंतु जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या संचारबंदीच्या आदेशाच्या अनुषंगाने परवानगी नाकारण्यात आली होती. मिरवणूक काढू नये यासाठी शीख समाजाचे धर्मगुरु, गुरुद्वाराचे प्रशासकीय समितीचे पदाधिकारी यांच्याशी वेळोवेळी बैठका झाल्या व त्यांना सुचना देण्यात आल्या. मिरवणूक सचखंड गुरुद्वारा परिसरातच काढण्यात येईल असे गुरुद्वारा प्रशासकीय समितीने सांगितले होते. परंतु दुपारी चारच्या सुमारास अरदास झाल्यानंतर गुरुद्वाराचे आतमध्ये हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली.

मात्र यावेळी काही तरुण मुले हल्लाबोल मिरवणूक बाहेर काढण्याच्या तयारीत असताना धर्मगुरु यांना बाहेर मिरवणूक न काढण्याची विनंती केली. परंतु तरुणांनी धर्मगुरुंचेही व पोलिसांचे न एकता पोलिसांवर तुफान दगडफेक करत बॅरिकेटींग तोडुन हातात तलवारी व लाठ्याकाठ्याने पोलिसांवर हल्ला केला. यात सात पोलीस अंमलदार जखमी झाले असून पोलिसांच्या आठ शासकीय वाहनांची प्रचंड तोडफोड करण्यात आली आहे.

या घटनेच्या अनुषंगाने वजिराबाद पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून जवळपास चारशे जनावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल असून त्यापैकी 18 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नांदेड जिल्ह्यातील जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये पोलिसावर केलेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने कोणाचीही गय केली जाणार नाही. सदर प्रकरणातील दोषींना ताब्यात घेऊन कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आणि जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी लष्करे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × one =

Close