January 21, 2022

पैसा ओतून निवडणुका जिंकायच्या

Read Time:4 Minute, 3 Second

राज्यातील महानगरपालिका व नगर परिषदा, नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अध्यादेश प्रस्थापित करण्यासाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

आपल्याला हव्या त्या पद्धतीने प्रभागरचना करायची आणि पैसा ओतून निवडणुका जिंकायच्या. या पद्धतीचा त्रास लोकांना का? लोकांनी एकाऐवजी ३-४ उमेदवारांना का मतदान करायचं? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. जनतेला गृहीत धरून हवे ते करायचे, हे योग्य व कायदेशीर नाही. निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे, असेही राज यांनी म्हटले आहे.

२ चे प्रभाग, ३ चे प्रभाग, ४ चे प्रभाग हा कसला खेळ चालू आहे. उद्या तुम्ही ३-३ आमदारांचा, ३-३ खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का?. ग्रामपंचायतीला, जिल्हा परिषदेला १-१ उमेदवार चालतो अन् महापालिकेला फक्त प्रभाग, हे यांच्या फायद्याचं. निवडणुकीची थट्टा करून ठेवलीय सरकारने. याप्रकरणी आता लोकांनीच कोर्टात जावे, निवडणूक आयोगाकडे जावे, अशी माझी विनंती आहे, असेही राज यांनी म्हटले.

सरकारने प्रभागरचना अगोदरच का बदलली होती. २ चे ४, ४ चे १ आणि १ चे ३ असे का केले? असे म्हणत प्रभागरचनेतील बदलांवरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणलेली वस्तुस्थिती यामुळे नागरी समस्यांचे निराकरण, जबाबदारी पार पाडणे, निर्वाहन हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वांमुळे (बहुसदस्यीय प्रभाग पध्दती) अधिक उचित पध्दतीने होऊ शकते. या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित कलमात सुधारणा करून महानगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सदस्यीय प्रभागरचनेला मंजुरी
महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य, परंतु दोनपेक्षा कमी नाहीत व चारपेक्षा अधिक नाहीत इतकी सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीसांची संमिश्र प्रतिक्रिया
काही वॉर्डांची तोडफोड करून आपल्याला हवा तसा वॉर्ड बनवून घेण्याचा सत्ताधा-यांचा प्रयत्न आहे. परंतु, आम्ही त्यासाठी सजग आहोत. निवडणूक आयोगाला आम्ही तसे कळवले आहे. जर काही कृती झाली नाही तर कोर्टात जाऊ असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × two =

Close