पेट्रोल ५, डिझेल १० रुपयांंनी स्वस्त

Read Time:4 Minute, 20 Second

नवी दिल्ली : दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची मोठी घोषणा केली. त्यामुळे उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपयांनी कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोल ५ आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला होता. भारतातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेले आहेत, तर काही शहरांत पेट्रोल १२० रुपये प्रतिलिटरपर्यंत गेले आहे. रोजच जवळपास ३५ पैशांनी पेट्रोल, डिझेल महाग होत होते. ४ ऑक्टोबर २०२१ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत पेट्रोलच्या दरात सरासरी ८ रुपयांनी वाढ झाली आहे.

मात्र, केंद्र सरकारने आज उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोल आणि डिझेल अ्ननुक्रमे ५ आणि १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. ऐन दिवाळीत हा निर्णय घेऊन महागाईने त्रस्त झालेल्या देशवासीयांना केंद्र सरकारने काही अंशी दिलासा दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नियमित होत असलेली पेट्रोल, डिझेलची दरवाढ दिवाळीच्या तोंडावर बुधवारी थांबली होती. यापूर्वी पेट्रोलच्या दरात सलग ७ दिवस तर डिझेलच्या दरात ६ दिवस ३५-३५ पैशांची वाढ करण्यात आली होती.

मंगळवारी पेट्रोलच्या किमतीत ३५ पैशांची वाढ करण्यात आली होती. परंतु डिझेलच्या किमतीत वाढ केली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. त्यातच आज लगेचच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ आणि १० रुपयांची कपात करून ऐन दिवाळीत देशवासीयांना दिलासा दिला. गुरुवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने उद्यापासून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे.

राज्यांनीही दिलासा द्यावा
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ आणि १० रुपयांची कपात करून ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यांनीही नागरिकांना दिलासा द्यावा. त्यासाठी राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट कमी करावा, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्रालयाने केले आहे. त्यामुळे केंद्रानंतर आता राज्य सरकारे दिलासा देणार का,याकडे लक्ष असणार आहे.

पोटनिवडणुकीनंतर सरकारचे पाऊल
देशातील तीन लोकसभा आणि २९ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला. यात भाजपला संपूर्ण देशात जोरदार झटका बसला. लिटमस टेस्टमध्ये भाजप बॅकफूटवर गेले. महागाई वाढल्यानेच भाजपला फटका बसल्याचा संदेश समोर आल्याने मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 − 10 =