
पेट्रोल, डिझेल पुन्हा महागणार?
नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसू शकतो. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकते. कारण कच्च्या तेलाच्या किमती ७ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल ८७ डॉलरच्या पुढे गेली आहे. यापूर्वी जानेवारी २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत ८७ डॉलरच्या वर गेली होती.
१ डिसेंबर २०२१ रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल ६८.८७ डॉलर होती, जी आता प्रतिबॅरल ८६ डॉलरच्या वर पोहोचली आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती २६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी आणि चलन) अनुज गुप्ता म्हणाले की, आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल ९० डॉलरपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे येत्या महिनाभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन ते तीन रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याशिवाय मध्यपूर्वेतही तणावाचे वातावरण आहे. सोमवारी संयुक्त अरब अमिरातीमधील विमानतळावर ड्रोन हल्ल्यामुळे एक नवीन संकटाचा जन्म झाला. ज्यामुळे तेल उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या घटनांचा कच्च्या तेलाच्या उत्पादनावर आणि मागणीवर परिणाम होईल, ज्यामुळे त्याचे भाव वाढतील.
बिघडू शकते सरकारचे बजेट
अंदाजानुसार जर कच्च्या तेलाचा भाव १० डॉलर प्रतिबॅरल वाढला तर यातून राजकोषीय घाट्यात १० बेस पॉइंटची वाढ होते. यामुळे महागाईदेखील वाढते. ज्यामुळे व्याजदर वाजवी ठेवणे आरबीआयला कठीण होईल.
३ नोव्हेंबरला सरकारने
कर कमी केला होता
केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती. दुस-याच दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आणि अनेक राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केले. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. गेल्या ७५ दिवसांपासून देशात इंधन दरवाढ झालेली नाही, असे ट्रेंड दाखवतात.