January 19, 2022

पृथ्वीवर शनिवारी धडकणार सौर ज्वालांचे वादळ

Read Time:2 Minute, 59 Second

नवी दिल्ली : सूर्यावर सातत्याने स्फोट होत असतात, या स्फोटांमुळे विविध माध्यमातून ऊर्जा ही सर्व बाजुंना सतत फेकली जात असते. प्रकाश हा त्यापैकीच एक. हे स्फोट सूर्याच्या आतमध्ये आणि भुपृष्ठावर होत असतात. तर कधी कधी याची तीव्रता एवढी प्रचंड असते की स्फोटापासून तयार झालेल्या सौर ज्वालांची तीव्रता ही कित्येक कोटी किलोमीटर अंतरापर्यंत प्रभावी ठरते.

असाच एक मोठा स्फोट २८ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार ११ वाजून ३५ मिनिटांनी नोंदवण्यात आला. सूर्याचा अभ्यास करणा-या नासाच्या ‘सोलर डायनामिक्स ऑब्झर्वेटरी’ या कृत्रिम उपग्रहाने त्या स्फोटाची नोंद केली. या उपग्रहाने पाठवलेल्या माहितीचे विश्लेषण केले असता गेल्या काही महिन्यातील सूर्यावर नोंद झालेल्या सर्वात मोठ्या स्फोटापैकी हा एक स्फोट असल्याचे लक्षात आले आहे.

या स्फोटापासून तयार झालेल्या सौर ज्वाला या अत्यंत प्रभावी असल्याचेही लक्षात आले आहे. या सौर ज्वाला या चुंबकीय कणांच्या स्वरुपात पृथ्वीवर आदळणार आहेत. अर्थात याचा पृथ्वीला किंवा पृथ्वीवरील जीवसृष्टीला कोणताही धोका नाही. कारण पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामध्ये ही धडक पचवण्याची क्षमता आहे. पण यामुळे चुंबकीय वादळ पृथ्वीभोवती तयार होऊ शकते. याचाही पृथ्वीवर परिणाम होणार नसला तरी पृथ्वीभोवती फिरणा-या कृत्रिम उपग्रहापासून येणा-या सिग्नलवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: जीपीएस सिग्नलवर याचा परिणाम होणार का याकडे लक्ष ठेवले जाणार आहे.

हा सर्व प्रभाव फक्त काही तास रहाण्याची शक्यता आहे. यामुळे ३० ऑक्टोबर म्हणजे उद्याचे काही तास हे महत्त्वाचे ठरणार आहेत. या विषयावर संशोधन करणारे, काम करणारे तंत्रज्ञ-अभ्यासक हे पृथ्वीवर धडकणा-या सौर ज्वाला आणि त्यापासून निर्माण होणा-या परिणामांवर, उपग्रहांपासून येणा-या सिग्नलवर लक्ष ठेवून असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + nineteen =

Close