August 9, 2022

पृथ्वीचे ऊर्जा असंतुलन

Read Time:5 Minute, 49 Second

गेल्या चौदा वर्षांमध्ये पृथ्वीचे ऊर्जा असंतुलन दुप्पट झाले आहे आणि ही एक अत्यंत दु:खाची आणि चिंतेची बाब आहे. पृथ्वीचे तापमान खूपच वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे जलवायू परिवर्तनाचे संकट गडद होत चालले आहे. पृथ्वीचे ऊर्जा संतुलन आणि त्यात होणारे बदल जाणून घेण्यासाठी नासा आणि युनायटेड स्टेट्स नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमोस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या (एनओएए) यांनी केलेल्या अभ्यासातून हे वास्तव उघड झाले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल जियोफिजिकल रिसर्च लेटरमध्ये प्रकाशित झाले आहेत. पृथ्वीचे तापमान एका नाजूक संतुलनामुळे निर्धारित होते, हे सर्वांना ठाऊक आहेच. पृथ्वी ठराविक प्रमाणात सूर्याची उत्सर्जित ऊर्जा मिळविते आणि नंतर इन्फ्रारेड तरंगांच्या रूपात अतिरिक्त उष्मा अंतरिक्षात उत्सर्जित करते. ऊर्जा असंतुलनाचा अर्थ असा की, पृथ्वी अधिक ऊर्जा ग्रहण करीत आहे आणि त्यामुळे ती अधिक तप्त होत आहे.

नासा आणि एनओएएच्या शास्त्रज्ञांनी ऊर्जा असंतुलन मोजण्यासाठी दोन पद्धतींनी मिळविलेल्या आकडेवारीची तुलना केली आहे. दोन्हीचे निष्कर्ष एकसारखेच आले. हे निष्कर्ष असा अचूक अंदाज बांधण्यासाठी आपल्याला बळ देतात, की ऊर्जा असंतुलन हे वास्तव असून, ती केवळ कल्पना नव्हे. ऊर्जा असंतुलनामुळे सुमारे ९० टक्के अतिरिक्त ऊर्जा समुद्राचे तापमान वाढवीत आहे. त्यामुळे येणा-या आणि जाणा-या उत्सर्जनाच्या सर्व नोंदी असेच दाखवून देतात की, होत असलेल्या बदलांमुळे समुद्राचे तापमान वाढत आहे. या शोधनिबंधाचे प्रमुख लेखक आणि नासाशी संलग्न नॉर्मन लोएब असे म्हणतात की, सध्या मिळत असलेले संकेत एका दृष्टीने मोठा इशारा देणारे आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन यांसारख्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात वाढ झाल्यामुळे तापमान वाढत चालले आहे. हे वायू तापमान वातावरणातच कायम पकडून ठेवतात. बाहेर जाणा-या उत्सर्जनात अडथळा बनल्याने ते अंतरिक्षात जाऊ शकत नाही.

या संशोधनानुसार, जागतिक तापमानवाढीमुळे अन्य परिणामही होत असतात. उदाहरणार्थ, जलबाष्पामध्ये होणारी वाढ, बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळणे, ढग आणि सागरातील बर्फ कमी होणे इत्यादी. पृथ्वीच्या ऊर्जा असंतुलनात या सर्व घटकांचा थेट परिणाम दिसून येतो. या असंतुलनाचे मोजमाप करण्यासाठी शास्त्रज्ञांनी उपग्रहावरून मिळालेली आकडेवारी, ढगांमध्ये होणारे परिवर्तन, वायूंचे प्रमाण, सूर्याचा प्रकाश आणि महासागरांत लावण्यात आलेल्या सेन्सर प्रणालीचा अवलंब केला आहे. संशोधकांना असेही आढळून आले की, प्रशांत महासागराच्या दीर्घकालीन महासागरीय चढ-उतारांमुळे थंड टप्प्याकडून उष्ण टप्प्याकडे होणारा गतिमान प्रवास हादेखील ऊर्जा असंतुलनाच्या तीव्रतेचा परिणाम आहे. पृथ्वीच्या प्रणालीत नैसर्गिक रूपाने होणारी ही अंतर्गत परिवर्तनशीलता हवामान आणि जलवायू यांवर दूरगामी परिणाम करू शकेल.

लोएब यांनी असाही इशारा दिला आहे की, हे संशोधन म्हणजे दीर्घकालीन जलवायू परिवर्तनावर टाकलेली केवळ एक नजर आहे. आगामी दशकांमध्ये पृथ्वीच्या तापमान असंतुलनाची गती कोणत्या दिशेने आणि किती वेगाने होईल, हे सांगणे एवढ्या संशोधनावरून शक्य नाही. अर्थात, संशोधनाचा निष्कर्ष असाच आहे की, जोपर्यंत तापमानवाढीचा वेग कमी होत नाही, तोपर्यंत वातावरणात बदल होत राहतील. वॉशिंग्टनमधील सिएटलमध्ये नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिकल अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या पॅसिफिक मरीन एनव्हायर्नमेन्टल लॅबोरेटरीशी संलग्न असणारे आणि या संशोधनाचे एक सहलेखक ग्रेगरी जॉन्सन यांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीवरील जलवायू परिवर्तन समजून घेण्यासाठी या ऊर्जा असंतुलनाच्या परिणामांचे अवलोकन करणे महत्त्वपूर्ण आहे.

अनिल विद्याधर

Leave a Reply

Your email address will not be published.

four × 5 =

Close