पूर्व सीमेवर राफेल तैनात

Read Time:4 Minute, 7 Second

नवी दिल्ली : चीनला लागून असलेल्या पूर्व सीमेवर सिक्कीम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळच्या एअर बेसवर भारताने आपली अत्याधुनिक राफेल फायटर विमाने तैनात केली आहेत. चीन ज्या पद्धतीने, थेट युद्ध लढण्याऐवजी शक्ती प्रदर्शन करुन शत्रूवर मानसिक दबाव टाकण्याची खेळी खेळतो, हा सुद्धा तसाच भाग आहे. शनिवारी भारत आणि चीनमध्ये उच्चस्तरीय लष्करी चर्चा होणार आहे. त्याआधी पूर्व सीमेवर राफेलची तैनाती झाली आहे.

पश्चिम बंगालच्या हासीमारा एअर बेसवर राफेलची अखनूर स्क्वाड्रन तैनात राहणार आहे. या स्क्वाड्रनमध्ये घातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली आठ नवीन बहुउद्देशीय राफेल फायटर विमाने आहेत. ४.५ जनरेशनच्या राफेल फायटर विमानाच्या नुसत्या उड्डाणाने शत्रुला धडकी भरु शकते. राफेल विमानांमुळे कधीही, कुठेही गरज असेल, तेव्हा वर्चस्व निर्माण करता येऊ शकते. नुसत्या या फायटर विमानांच्या उपस्थितीने शत्रुच्या मनात भीती निर्माण होईल, असे एअर फोर्स प्रमुख आर.के.एस भदौरिया यांनी सांगितले.

राफेलची पहिली स्क्वाड्रन गोल्डन ऍरो अंबाला एअर बेसवर पूर्णपणे कार्यान्वित झालेली आहे. या स्क्वाड्रनमध्ये १८ फायटर विमाने आहेत. पूर्व लडाख सीमेवर नेहमी या स्क्वाड्रनचा सराव सुरु असतो. अजूनही या भागात चीन बरोबर सुरु असलेला सीमावाद मिटलेला नाही. पूर्व सीमेवर तेजपूर, चाबुआ बेसवर रशियन बनावटीची सुखोई-३० विमाने आधीपासूनच तैनात आहेत. आता त्यांच्याजोडीला राफेल दाखल झाले आहे. त्यामुळे चीन विरोधात भारताची हवाई शक्ती अधिक मजबूत झाली आहे.

एअरबेसवर अनेक सुविधा
इंडियन एअर फोर्सच्या तुलनेत चीनकडे असलेल्या फायटर विमानांची संख्या जास्त आहे. मागच्यावर्षी लडाख सीमावादाला सुरुवात झाल्यापासून, त्यांनी भारतीय सीमेपासून जवळ असलेल्या होतान, काशगर, गर्गउनसा या एअर बेसवर अनेक सुधारणा केल्या आहेत.

चीन, पाकवर करडी नजर
युद्ध प्रसंगात चीन आणि पाकिस्तानवर अचूक प्रहार करण्यासाठी निर्णायक ठरणारी ३५ राफेल फायटर विमाने २०२१ अखेरपर्यंत फ्रान्स भारताला देणार आहे. भारताने फ्रान्स बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. त्यानुसार, वर्षअखेरपर्यंत भारताला ३५ राफेल मिळतील. उर्वरित एक विमान जानेवारी २०२२ मध्ये वायुदलात दाखल होईल.

आतापर्यंत २६ राफेल भारताकडे
फ्रान्सने आतापर्यंत २६ राफेल विमाने भारताकडे सुपूर्द केली आहेत. त्यात २४ राफेल भारतामध्ये आहेत. उर्वरित दोन विमाने आयएएफचे वैमानिक आणि तंत्रज्ञानाना प्रशिक्षण देता यावे, यासाठी फ्रान्समध्ये ठेवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

ten − 8 =