पुतीन करणार संपूर्ण युद्धाची घोषणा?

Read Time:2 Minute, 14 Second

लंडन : आतापर्यंत युक्रेनच्या आक्रमणाला ‘युद्ध’ हा शब्द टाळणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण युद्धाची घोषणा करतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रशियाला मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करता येणे शक्य होईल आणि त्यातून युद्धाचा आणखी मोठा भडका उडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केले. त्यावेळी ‘विशेष लष्करी मोहीम’ असल्याचे पुतीन यांनी जाहीर केले होते. युक्रेनचे निर्लष्करीकरण करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले होते आणि युद्ध हा शब्द टाळला होता. मात्र, आता तिस-या महिन्यानंतरही रशियाला या कारवाईत पुरेसे यश मिळालेले नाही. त्यामुळे लष्करी अधिकारी अस्वस्थ झालेले आहेत.

रशियामध्ये ९ मे रोजी विजय दिवस साजरा करण्यात येतो, त्या दिवशीच पुतीन युद्धाची घोषणा करतील, असा अंदाज ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी व्यक्त कले, तर पाश्चिमात्य देशांनी युक्रेन युद्धातील आणखी गंभीर टप्प्यासाठी स्वत:ला तयार करावे, असा इशारा ‘नाटो’चे माजी प्रमुख रिचर्ड शेरीफ यांनी दिला आहे.

कीव्हवरील हल्ल्यामध्ये अपयश आल्यामुळे रशियाच्या लष्करामध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळे या अपयशाची किंमत चुकती करण्यासाठी रशियाचे लष्कर युक्रेनमध्ये आणखी कारवाई करण्यासाठी उत्सुक आहे, असे रशियाच्या लष्करी सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 + three =