
पुढील ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस
पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्यानंतर, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी दिवसा उन्हाचा तडाखा आणि पहाटे गारठा पडत आहे. असे असताना मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होते आहे. आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वेगवान वा-याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, ३० ते ४० किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. आजपासून पुढील पाच दिवस राज्यात कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
आज राज्यात एकूण सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहेत. त्याचबरोबर उद्या रायगड, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. खरंतर सध्या श्रीलंका आणि तामिळनाडू किनारपट्टी दरम्यान हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र सध्या पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
पुण्यात मुसळधार
पुण्यात मात्र गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे. त्यानंतर आता बुधवार (३ नोव्हेंबर) पासून सलग तीन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. संबंधित तिन्ही दिवसांसाठी हवामान खात्याने पुण्यात येलो अलर्ट जारी केला आहे. ऐन दिवाळी सणाच्या मूहुर्तावर पुण्यात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे