January 19, 2022

परब यांनी सोमय्यांविरोधात ठोकला १०० कोटींचा दावा!

Read Time:4 Minute, 9 Second

मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांविषयी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना ७२ तासांत माफी मागण्यास सांगितले होते. मात्र, ७२ तासांत किरीट सोमय्यांकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात तब्बल १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. तसेच, आपण किरीट सोमय्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती अनिल परब यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. दापोलीमध्ये अनिल परब यांचे अवैध रिसॉर्ट असल्याचा देखील आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

किरीट सोमय्या यांनी नुकतेच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्याआधी देखील त्यांनी अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. अनिल परब यांच्यावर देखील दापोलीमधील रिसॉर्टवरून त्यांनी आरोप केल्यानंतर त्यावर अनिल परब यांनी त्यांना ७२ तासांत माफी मागण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांनी माफी न मागितल्यामुळे आता अनिल परब यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान अनिल परब यांनी या याचिकेमध्ये १०० कोटींसोबतच किरीट सोमय्यांकडून विनाअट माफीची मागणी केली आहे. त्याचसोबत ही माफी त्यांनी दोन वर्तमानपत्रांमध्ये छापून आणावी आणि त्यांच्या ट्विटर हँडलवर न्यायालय ठरवेल तेवढा काळ ही माफी ठेवावी, अशी देखील मागणी अनिल परब यांनी केली आहे.

आधी नोटीस, आता दावा
अनिल परब यांनी १४ सप्टेंबर रोजी सोमय्यांविरोधात १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले होते. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पाठवली आहे. त्यानुसार आता सोमय्या यांना ७२ तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसेच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

सोमय्या काय म्हणाले?
परब यांनी नोटीस पाठवल्यानंतर सोमय्या यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नाही. आता शिवसेनेला असे वाटणार नाही की फक्त आमचेच घोटाळे बाहेर काढतात. आता विदर्भातील काँग्रेसचे मंत्री टार्गेटवर असल्याचा इशाराच सोमय्या यांनी दिला होता. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे बाहेर येणार आहेत. एनसीपी परिवारातील एक मोठा घोटाळा बाहेर येणार आहे, असे सोमय्या म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 1 =

Close