पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता

Read Time:6 Minute, 18 Second

लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत त्वचा व गुप्तरोग शास्त्र विभागाचे माहे एप्रिल २०२१ मध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, नवी दिल्लीच्या वतीने निरीक्षण होवुन दि. २ जुलै २०२१ रोजीच्या दिल्ली येथील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील त्वचा व गुप्तरोगशास्त्र विभागाला ३ पदांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मान्यता दिल्याचे कळविण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था ही जिल्हा रुग्णालयाकडुन हस्तांतरीत होऊन सन २००९ साली कार्यान्वित करण्यात आली होती. त्याचवेळी या वैद्यकीय महाविद्यालयात त्वचा व गुप्तरोगशास्त्र विभाग स्वतंत्ररित्या कार्यरत झाला. सुरुवातील १०० एम. बी. बी. एस. विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालय २०१८ साली १५० विद्यार्थी प्रतिवर्ष क्षमतेचे करण्यात आले. त्याचबरोबर अनेक विभागांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करुन त्यांची मान्यता मिळविण्यास ही संस्था यशस्वी ठरली. त्वचा व गुप्तरोगशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी सन २०१८ पासुन प्रयत्न सुरु करण्यात आले होते असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे निरीक्षण, संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन, सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या शिफारशीने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे मान्यतेसाठी सन २०१९ मध्ये अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर माहे एप्रिल २०२१ मध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, नवी दिल्ली चे निरीक्षण होवुन दि. २ जुलै २०२१ च्या दिल्ली येथील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील त्वचा व गुप्तरोगशास्त्र विभागाला ३ पदांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मान्यता दिल्याचे कळविण्यात आले आहे, असे माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

हा अभ्यासक्रम सुरु व्हावा व मान्यता मिळावी यासाठी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, डॉ. श्रीकांत गोरे, डॉ. मोहन डोईबळे, व सध्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या सहकार्याने प्राध्यापक व विभागप्रमुख त्वचा व गुप्तरोग विभाग डॉ. अजय ओव्हाळ, उप अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहाण, उप अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, पदव्युत्तर उप अधिष्ठाता डॉ. उमेश लाड, पदवीपूर्व उप अधिष्ठाता डॉ. मंगेश सेलुकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, डॉ. उमेश कानडे, सहयोगी प्राध्यापक त्वचा विभाग डॉ. केतकी चवंडा, डॉ. भुषण दरकसे, डॉ. दिपा पुरी, डॉ. गितांजली मठपती यांनी वेळोवेळी प्रयत्न केले.

दरवर्षी ३ एम. डी. पदाची अर्हता प्राप्त तज्ज्ञ डॉक्टर्स तयार होणार
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपुर, औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्वचा व गुप्तरोगशास्त्र विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु असुन त्यानंतर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर या संस्थेने अतिशय कमी वेळेत पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळवून बाजी मारली आहे. त्वचा व गुप्तरोगशास्त्र या अभ्यासक्रमामुळे या ठिकाणी दरवर्षी ३ एम. डी. पदाची अर्हता प्राप्त तज्ज्ञ डॉक्टर्स तयार होणार आहेत. त्यामुळे एम. डी. त्वचा व गुप्तरोगशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर्स मराठवाडयासाठी भावी काळात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्वचा व गुप्तरोगशास्त्र विभागामध्ये त्वचारोगाच्या दुर्धर आजारांवर उपचार व संशोधन कार्यास या अभ्यासक्रमामुळे नक्कीच चालना मिळेल, असे मत अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + nineteen =