…पण मी सचिन वाझेंना कधी पाहिलंच नाही, ना कधी भेटलो” – मनिष भतिजा

Read Time:2 Minute, 43 Second

मुंबई | एटीएसने काल जप्त केलेली व्होल्वो कार ही पॅरेडाइज ग्रुपच्या मनीष भतीजा यांची असल्याचं स्पष्ट झालं होतं. मनीष भतिजा यांनी आता पुढे येत यावर प्रतिक्रिया दिली आहे. “कार माझी आहे, पण मी कधीही सचिन वाझे किंवा अभिषेक अग्रवाल या दोघांनाही पाहिलं नाही, किंवा कधीही भेटलो नाही.” असं भतीजा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

माझी कार मी माझा व्यावसायिक भागीदार इस्माईल दाडीवाल यांना तीन वर्षापूर्वी वापरायला दिली होती. त्यांनी नंतर ही गाडी अनिल अग्रवाल म्हणजेच अभिषेक अग्रवाल यांचे वडील यांना दिल्याची माहिती भतीजा यांनी या माध्यमातून दिली आहे. त्याबरोबरच मी अभिषेक अग्रवाल यांना कधीही पाहिले नाही. असा खुलासाही त्यांनी केला.

तपास यंत्रणा चौकशीसाठी मला कधीही बोलवेल तरी मी त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे सौजन्य दाखवेल. असं मनीष भतीजा यांनी यावेळी सांगितलं. त्याबरोबरच अभिषेक अग्रवाल सह या प्रकरणात त्याचे वडील अनिल अग्रवाल यांचीही चौकशी व्हायला पाहिजे. अशी मागणी मनीष भतिजा यांनी केली. मी कोणताही गुन्हा केला नाही त्यामुळे मी माझा जबाब द्यायला तयार आहे. अशी भूमिका त्यांनी मांडली.

माझ्या बिझनेस पार्टनरचा हा विश्वासघात आहे आणि या प्रकरणात अभिषेकचे वडील अनिल अग्रवाल यांच्यावर मनीष भतीजा यांनी आरोप केले आहेत. तसेच आपली गाडी एटीएसने जप्त केल्याची बातमी कळताच धक्का बसला असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात एटीएसला नवनवीन पुरावे हाती लागत आहेत नुकतीच सचिन वाझे वापरत असलेली गाडी एटीएसला दमनमध्ये आढळून आल्याने खळबळ माजली होती. संबंधित कारची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी केली जात असून पुढील माहिती लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × 2 =